गरिबांची लाज वाटणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध!: सचिन सावंत
मुंबई,
अहमदाबाद भेटीवेळी तिथली गरिबी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिसू नये म्हणून मोठी भिंत बांधून गरिबी लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न मोदी सरकारकडून केला जात आहे. मोदी सरकारचे हे कृत्य अमानवी असून काँग्रेस त्याचा जाहीर निषेध करत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
सावंत पुढे म्हणाले की, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ११ वर्षात आपण देशातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त विकास केला असल्याचे ढोल याच नरेंद्र मोदी यांनी पिटले होते. पण त्यांचा गुजरात मॉडेल सपशेल खोटा आहे. सत्तेत असताना काही विकास केला असता तर अहमदाबादमधील गरिबांची ही वस्ती दिसली नसती. पण गरिबांसाठी काही केलेच नाही म्हणून तर लपवाछपवी करावी लागत आहे. अहमदाबादमधील गरिबांच्या झोपड्या ट्रम्प यांना दिसू नये यासाठी चालवलेला खटाटोप अत्यंत निंदनीय व लाजिरवाणा आहे. अमेरिकेतही गरिबी आहेच मग भारतातील गरिबीचे दर्शन ट्रम्प यांना झाले तर असा कोणता डोंगर कोसळणार आहे. परंतु आपण विकास पुरुष असल्याचा आव आणून बकाल शहर व गरिबी हटवण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी केलेला हा घृणास्पद प्रकार आहे. नरेंद्र मोदी हे स्वतः गरिबीतून पुढे आल्याचे अनेकदा सांगत असतात मग आता त्यांना गरिबीची एवढी लाज का वाटावी ?
डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदाच अहमदाबादमध्ये येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. हाच पैसा या गरिबांसाठी वापरला असता तर अशी भिंत बांधून लपवाछपवी करण्याची वेळ मोदींवर आली नसती पण त्यांना गरिबांविषयी कणव असण्याचे कारण नाही. गरिबांच्या कल्याणासाठी काही केले असते तर गरिब श्रीमंतामधील भिंत आपसूकच गळून पडली असती. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूअल मॅक्रॉन यांच्या वाराणसी भेटीवेळीही गंगेतील घाण त्यांना दिसू नये म्हणून मोठं-मोठे होर्डींग लावले होते, असेही सावंत म्हणाले.
0 टिप्पण्या