Top Post Ad

श्रीरामाने खाल्लेले कंदमुळ नेमके काय 

श्रीरामाने खाल्लेले कंदमुळ नेमके काय 



कोल्हापूर
वाडी रत्नागिरी अर्थात जोतिबा डोंगरावर काही विक्रेते श्रीरामाने खाल्लेले कंदमुळ म्हणून एका भल्या मोठ्या ओंडका सदृश्य मांसल कंदाचे काप विकत असताना दिसतात, पण ते नेमकं काय आहे याचा कुणी, कधी विचारच करतांना दिसत नाही. नेहमीप्रमाणे श्रद्धेचा भाग येत असल्यामुळे सर्वजण याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मात्र हे कंदमुळ वगैरे काही नाही, तर ते आपल्याकडे आढळणा-या एका वनस्पतीचा खोडाचा भाग आहे. जोतिबावर जाणा-या अनेक पिढ्यांनी हे कंदमुळ खाल्लं असेल, आणि श्रीरामाने खाल्लेय म्हणून आपणही ते श्रद्धेनं खाल्ल असेल. वनवासाच्या काळात राम सीता आणि लक्ष्मण यांनी हे कंदमुळं खाऊन दिवस काढले असल्याचे विक्रेते सांगतात, त्यामुळे लहानमुलं तर हमखास ते काप खातात. हे एवढं मोठं मुळ कुठल्या वनस्पतीचं असेल असा प्रश्नही अनेकांना पडतो, पण ते विक्रेते सांगतात की हे मुळ जंगलात मिळतं.
कोल्हापूरातल्या काही संशोधकांनी या सगळ्या फसवणुकीवरचा पडदा उठवला आहे. कोल्हापूरातील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. विनोद शिंपले, डॉ. निलेश पवार, डॉ. मानसिंगराज निबाळकर यांना याबाबत शंका आली. हे नेमके कुठलं मुळ आहे, आणि हे खरंच कंदमुळ आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला. विक्रेत्यांना विचारले असता हे मुळ आफ्रिकेहून आयात करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले. त्यांनी असे कंदमुळ विकणा-याकडून काही काप खरेदी केले. प्रयोगशाळेत या वनस्पतीची संरचना तपासली. त्यामुळे कंदमुळ म्हणून विकला जाणारा हा काप मुळाचा नसून एकदल खोडाचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही वनस्पती बाहेरून आयात केलेली नसून आपल्याकडे माळरानावर आढळणारी केकताड किंवा घायपात ही वनस्पती आहे. या वनस्पतीपासून वाक तयार करून त्यापासून दोरखंड बनवले जात होते.
ही वनस्पतीची पूर्ण वाढ झाल्यानंतर तिला मधोमध एक बांबुसारखा कोंब येतो. त्याच्या टोकाला फुलोरा येऊन त्याला बीज लागतात. या फुलातून बीज रुजून त्याला या झाडावरच त्याची छोटी छोटी पिलं तयार होतात. हे या वनस्पतीचे वैशिष्ट्ये आहे. या अवस्थेत वरचा बांबू आणि बाजूची पाने काढून टाकून मध्ये अननसासारखा भला मोठा भाग मिळतो. त्यातील पानाचा भाग तासून टाकून त्यावर रंधा मारला की पूर्ण सफेद रंगाचा कंदासारखा भाग तयार होतो, त्यावर लाल रंगाची काव लावून तो मातीतून काढलेला आहे, असे भासवून त्याची कंद म्हणून विक्री केली जाते. संशोधकांनी जनुकीय चाचणी करून या वनस्पतीच्या कुळाचा शोध घेतला. डीएनए बारकोडींग पद्धतीचा वापर करण्यात आला . कंद म्हणून विकले जाणारे हे काप नैसर्गिक रित्या गोड नसतात, त्यावर सॅकरीन टाकून ते गोड करण्यात येते. पण त्यामध्ये व्हीकोजेनीन नावाचे स्ट्युराईड असते. त्यामुळे हे अतिप्रमाणात खाल्यास अपायकारक ठरू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com