रोटरीच्या वतीने रविवारी ठाण्यात वॉकेथॉन
ठाणे
रोटरी डिस्ट्रीक्ट 3142 च्या वतीने ठाणे जिह्यात रविवार, 23 फेब्रुवारी रोजी नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. 5 किलो मीटर चालल्यानंतर या उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांची रक्तदाब, मधुमेह आणि बॉडी मास इंडेक्स या चाचण्या होणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत रोटरीचे गव्हर्रनर डॉ. मोहन चंदावरकर यांनी दिली. पत्रकार परिषदेला रोटरीचे ज्येष्ठ पदाधिकारी विनीत शहा, डॉ. सुहास कुलकर्णी आणि मिलिंद बल्लाळ उपस्थित होते.
डॉ. मोहन चंदावरकर यांनी सांगितले की, आजच्या धावपळीच्या जिवनात नागरिकांना विकार जडत आहेत, त्यामुळे जनजागृती होण्याची गरज आहे. म्हणूनच रोटरी तर्फे वॉकेथॉन आणि त्यानंतर चाचण्या हा उपक्रम ठाणे जिह्यात 98 क्लबच्यावतीने एकाच दिवशी म्हणजे 23 फेब्रुवारी रोजी राबविण्यात येणार आहे.
ठाणे शहरात रविवारी सकाळी 6.30 वाजता रेमंड कंपनीच्या मैदानातून सुरुवात होणार आहे. रोटरी इंटरनॅशनल चे संचालक डॉ. भरत पंड्या यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 23 फेब्रुवारी हा रोटरी चा स्थापनादिन आहे त्याचेच औचित्य साधून हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे डॉ. चंदावरकर यांनी सांगितले.
`एक चमचा कमी, चार पावले पुढे' असे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. साखर, तेल आणि मिठ यांचे सेवन दैनंदिन जिवनात एक चमचा कमी करुन अर्धा तास चालावे असा संदेश या वॉकेथॉन मधून देण्यात येणार आहे. ठाणेकरांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. चंदावरकर यांनी केले आहे. अधिक माहिती साठी आणि नाव नोंदणी साठी डॉ. सुहास कुलकर्णी 8850905019 आणि विनीत शहा 8419914999 यांच्याशी संपर्क साधावा.
0 टिप्पण्या