आक्रोश लाँग मार्च काढण्याचा आमदार संजय केळकर यांचा इशारा
ठाणे
ठाण्यातील मानपाडा येथील ॲक्मे दोस्ती आणि अन्य ठिकाणी असलेल्या इमारतीत बाधित लोकांना राहण्यास जागा देण्यात आली आहे. परंतु या लोकांना ठाणे महानगर पालिकेमार्फत कोणत्याही सोयी सुविधा देण्यात येत नसल्याची तक्रार येथील रहिवाशांनी आमदार संजय केळकरांकडे केली. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आमदार केळकर यांनी याविषयी चर्चा केली. तसेच भाडेतत्वावरील इमारतींमध्ये राहणा-या या रहिवाशांना योग्य त्या सुविधा न पुरवल्यास या रहिवाशांसह आक्रोश लाँग मार्च काढण्याचा इशारा आमदार संजय केळकर यांनी महापालिका अधिका-यांना यावेळी दिला आहे.
ठाण्यातील विविध विषयांसंदर्भात आमदार संजय केळकर यांनी अतिरिक्त आयुक्त अहिवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. या बैठकीला नगरसेवक सुनेश जोशी, उपायुक्त अशोक बुरपुले, शहर अभियंता देशमुख, अन्य विभागाचे अधिकारी, बापू साळवे आणि भाडेतत्वावर राहणा-या रहिवाशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ही लोकं त्या ठिकाणी नरक यातना भोगत असून महापालिकेने याकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे. काही ठिकाणी ड्रेनेज तुंबले आहेत तर काही ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे. २२ ते ३० मजल्याच्या इमारतींमध्ये चार चार लिफ्ट आहेत पण त्यातील एकच लिफ्ट चालू आहे तर बाकीच्या बंद असल्यानं ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत असल्याचं केळकर यांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिलं. या बैठकीमध्ये शहरातील वाढती अतिक्रमणं, रस्ते, उद्यानं ही महापालिकेनं संस्थांना काही अटी-शर्तींवर दिल्यास त्यांची देखभाल होऊ शकते असा मुद्दाही संजय केळकर यांनी या बैठकीत मांडला. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या रहिवाशांना योग्य त्या सुविधा मिळाल्याच पाहिजेत असं त्यांनी अधिका-यांना सुनावले.
0 टिप्पण्या