बॅ. ए. आर. अंतुले यांची प्रतिमा तर दि.बां.चे तैलचित्र लावण्याची मागणी
पनवेल: राज्यातील संजय गांधी निराधार योजना कार्यालय व सार्वजनिक आरोग्य केंद्रात माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय आरोग्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांची प्रतिमा लावण्यात यावी. तसेच सिडको भवनात लोकनेते दि . बा. पाटील यांचे तैलचित्र लावण्यात यावे, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी केली आहे.
पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोकणचे भाग्यविधाते व कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते दिवंगत बॅ. अब्दुल रहेमान अंतुले यांनी त्यांच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात निराधार महिलांसाठी राज्यभर ’संजय गांधी निराधार योजना‘ राबविली आहे. ती योजना आजही सुरू आहे.महाराष्ट्राला दूरदृष्टी देणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारेची दीक्षा देत महाराष्ट्राचा कारभार चालविणारे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांच्या कार्याचा गौरव करावा लागेल.
विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यप्रणालीवर दृढ श्रध्दा असलेल्या अंतुले यांचा जन्मही रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील आंबेत गावातील. रायगडच्या पवित्र मातीत जन्मलेल्या अंतुलेनी 1962 ते 1976,1976 ते 1980 आणि अगदी 1989 पर्यंत ते राज्याच्या विधानसभेत प्रतिनिधित्व करत होते. मा. बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते. जून 1980 ते 12 जानेवारी 1982 पर्यंत महाराष्ट्र राज्याचे ते आठवे मुख्यमंत्री राहिले आहेत. 1989 ते 1998 आणि पुढे 2004 ते 2009 पर्यंत ते दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते एकदा केंद्रीय आरोग्य मंत्री तर दुसर्या वेळी ते अल्पसंख्यांक मंत्री म्हणून कार्यरत होते. केंद्रीय आरोग्यमंत्री असताना त्यांनी देशाची भावी पिढी सुदृढ आणि ताठ कण्याची व्हावी म्हणून पोलिओ डोसची संकल्पना संपूर्ण देशभर राबविली. त्याचा परिणाम आज देशभर दिसत असून पोलिओने अपंगत्व येण्याचे प्रमाण संपुष्टात आले आहे. त्यांनी कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याची चुणूक त्यांच्या कारभारातून दाखवून दिली. त्यामुळे आज रायगडच्या जनतेला महाराजांशी थेट नातंही सांगता येतं. जय शिवाजी, जय भवानी आणि जय जिजाऊंच्या प्रेरणेतील रायगड आठवतो तेव्हा आठवतात ते माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले. राज्य शासनाने किमान महाराष्ट्रातील महसूल खात्याअंतर्गत येणारी संजय गांधी निराधार योजना कार्यालये आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रात प्रतिमा लावण्यात यावी, असा आग्रह कांतीलाल कडू आणि संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे.
त्याशिवाय 1984 च्या जासई (उरण) शेतकर्यांच्या गौरवशाली लढ्याचे अर्ध्वयू, लोकनेते दि. बा. पाटील यांचे सिडको प्रशासकीय बेलापूर भवनात तैलचित्र लावण्यात यावे आणि त्याचे अनावरण समारंभ पाच हुतात्म्यांच्या नातेवाईकांच्या शुभहस्ते आपल्या उपस्थितीत करण्यात यावे, अशीही महत्वपूर्ण मागणी याच निवेदनातून करण्यात आली आहे. लोकनेते पाटील हे पनवेल विधानसभा मतदार संघातून पाच वेळा निवडून आलेले आहेत. ते महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत. दोन वेळा ते खासदार होते. लोकहितविरोधी आलेल्या मंडल आयोगाला कडाडून विरोध करून त्यांनी स्वाभिमानाने खासदारकीचा राजीनामा दिला होता. ते विधान परिषद सदस्यही राहिलेले आहेत. तत्कालीन भाजपा सरकारकडे त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा म्हणून लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. परंतु त्यांनी पाटील आणि शेतकर्यांच्या लढ्याची अजिबात कदर केली नाही. त्यामुळे आपण मुख्यमंत्री म्हणून ही कार्यतत्परता दाखवावी, अशी विनंती करून महाराष्ट्रातील शेतकर्यांना लढा आणि न्याय हक्काचा परिपाक घालून देणारे लढाऊ, व्यासंगी, निरपेक्ष वृत्तीचा सच्चा नेता म्हणून दि.बा. यांचे नवी मुंबई, खारघर किंवा पनवेल, उरण परिसरात त्यांचे अत्याधुनिक स्मारक उभारावे. तीच येथील आगरी, कोळी आणि बारा बलुतेदारांच्या दैवताची खरी ओळख ठरले, असे त्या निवेदनात अत्यंत भावनिकतेने नमूद करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या