ठाणे स्थानकाच्या पश्चिमेला रेल्वे कॉलनीच्या दोन इमारती धोकादायक झाल्याने त्या रेल्वे प्रशासनाने पाडल्या. त्यामुळे येथील जागा मोकळी झाली होती. याचा गैरफायदा घेत काही समाजधुरीणांनी येथे स्वत:चे बेकायदा वाहनतळ सुरू केले. या ठिकाणी वाहने उभी करणाऱ्यांकडून प्रत्येक वाहनामागे शुल्क वसुलीही करण्यास सुरुवात केली आहे. यासंबंधीच्या अनेक तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे आल्या आहेत. तीन महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधीची माहिती वरिष्ठ स्तरावर पोहचवली. तसेच यावर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने या भागात आता स्वतचा असा वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे ठाणे रेल्वे स्थानकाला वाहतूक कोंडीचा मारा सहन करावा लागत आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी नसल्याने अनेकजण खासगी वाहने घेऊन ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने येत असतात. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला रेल्वेचे दुमजली वाहनतळ आहे. तर, पूर्वेला एक वाहनतळ आहे. ही पार्किंग व्यवस्थाही अपुरी पडत आहे. यावर उपाय म्हणून पश्चिमेला आणखी एक वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळत आहे.
या कामाची निविदा प्रक्रियाही रेल्वेने सुरू केली असून १ हजार ८८८.४९ चौरस मीटर इतक्या जागेत हे वाहनतळ उभे केले जाणार आहे. प्रत्येकी तीन महिन्यांसाठी १७ लाख २५ हजार ८४१ रुपयांची ही निविदा आहे. त्यामुळे रेल्वेला यातून दर वर्षी सुमारे ७० लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे. या वाहनतळात सुमारे पाचशे दुचाकी उभ्या राहू शकतात, ठाणे पश्चिमेकडून सर्वात जास्त प्रवासी ये-जा करत असतात. पश्चिमेला दुमजली वाहनतळ आहे. मात्र, या वाहनतळात चारचाकी वाहने उभी राहत नाहीत. त्यामुळे रेल्वे कॉलनी जागेतील हे नवे वाहनतळ उभे राहिल्यास चारचाकी वाहनेही या वाहनतळात उभ्या राहू शकतात अशी माहिती मिळत आहे.
बेकायदा वाहनतळामधून शुल्क वसुली
0 टिप्पण्या