दिल्ली दंगलीला चेथावणी देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
मुंब्रा येथे राष्ट्रवादीचे जोरदार आंदोलन
ठाणे
दिल्लीमध्ये झालेल्या हिंसेला भाजप नेते परवेश वर्मा, अनुराग ठाकूर, कपील मिश्रा आणि एमआयएमचे वारीस पठाण यांची चिथावणीखोर भाषणेच जबाबदार आहेत. त्यामुळे या चौघांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शानू पठाण म्हणाले की, परवेश वर्मा, अनुराग ठाकूर, कपील मिश्रा, वारीस पठाण यांच्यासारख्या लोकांमुळे हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद निर्माण केले जात आहेत. येथील मुस्लीम हा देशप्रेमी आहे. मात्र, हे लोक त्यांना बदनाम करीत आहेत. या चौघांपैकी परवेश वर्मा, अनुराग ठाकूर, कपील मिश्रा यांच्यावर एफआयआर दाखल करा, असे आदेश हायकोर्टाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. मात्र, गुन्हे दाखल करण्याऐवजी आदेश देणार्या न्यायाधीशांचीच बदली केली जात आहे. आता ही हुकूमशाही सहन केली जाणार नाही, असा इशाराही दिला.
भाजप नेते कपिल मिश्रा यांनी 23 फेब्रुवारीला मौजपूर मेट्रो स्टेशनजवळ सीएए समर्थनार्थ रॅली काढली होती. या रॅलीत मिश्रा यांच्यासह अनुराग ठाकूर, कपील मिश्रा यांनी प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. यासंबंधी सोशल मीडियावर ट्विटही करण्यात आलं होतं. तर, एमआयएचे वारी पठाण यांनी, 15 कोटी मुस्लीम 100 कोटींना भारी पडतील, असे विधान केले होते. या विधानांमुळेच दिल्लीमध्ये हिंसाचार भडकला असल्याचा आरोप करीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जुम्माचा नमाज अदा केल्यानंतर मुंब्रा येथील दारुल फलाह मशिदीसमोर मानवी साखळी धरुन निदर्शने करण्यात आली. यावेळी , परवेश वर्मा, अनुराग ठाकूर, कपील मिश्रा, वारीस पठाण यांच्यावर गुन्हे दाखल करा; हिंसा नको- शांतता हवी; अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात नगरसेवक अशरफ शानू पठान, साकिब दते,महेसर शेख,इब्राहिम राउत,बबलू सेमन,जावेद शेख,मयूर सारंग,रफ़ीक़ शेख,शशिराज,मिलान मौर्य,बैग साहब, नईम पंगरकर,मरजान मालिक,जावेद जग्गा,शाहिद पटेल यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, मुल्ला-मौलवी सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या