Top Post Ad

ठाणे महानगर पालिकेत होणारा पत्रव्यवहार हा मराठीतच असला पाहिजे - महापौर

ठाणे महानगर पालिकेत होणारा पत्रव्यवहार हा मराठीतच असला पाहिजे - महापौर



ठाणे, 
स्थानिक स्वराज्य संस्थेचा संपूर्ण कारभार मराठीतच चालतो, या अनुषंगाने महापौर जनसंवादात येणाऱ्या तक्रारी या मराठीतच असाव्यात, तसेच तक्रारी मांडताना  देखील मराठीतच मांडाव्यात. ठाणे पोलीस नागरिकांकडून तक्रारी घेताना त्या मराठी भाषेतच घेत असल्याचे पोलीस आयुक्त ‍विवेक फणसळकर यांनी जाहीर कार्यक्रमात नमूद केले. ठाणे महानगर पालिका ही तर स्थानिक स्वराज्य संस्था असून या ठिकाणी होणारा पत्रव्यवहार हा देखील मराठीतच असला पाहिजे अशी आग्रही भूमिका प्रशासनाने ठेवावी असे स्पष्ट निर्देश आज १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या दुसऱ्या महापौर जनसंवाद उपक्रमात महापौरांनी प्रशासनाला दिले.
तक्रारींच्या अनुषंगाने त्यांनी पदपथ व रस्ते हे नागरिकांना वा वाहतुकीसाठी असल्याने त्यावर कोणत्याही प्रकारचे  अतिक्रमण होणार नाही याबाबत प्रभाग समिती स्तरावर सातत्याने कारवाई करण्यात यावी तसेच नागरिकांनी परस्पर संबंधित विभागाकडे आपल्या कामकाजासंदर्भात सादर केलेल्या अर्जाचा योग्‌यवेळी निपटारा करावा जेणेकरुन नागरिकांना वारंवार हेलपाटे घालावे लागणार नाहीत. ठाण्यातील पदपथ व रस्ते हे नागरिकांसाठीच आहेत, ते कायमस्वरुपी मोकळे असलेच पाहिजे यापूर्वी देखील मी भूमिका मांडली आहे व त्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. यासाठी माझ्या विरोधात फेरीवाला संघटनांनी मोर्चे काढले, आंदोलने केली तसेच माझे पुतळे जाळले तरी चालेल असे स्पष्टपणे नमूद करीत कायदा हा सर्वांना सारखा आहे त्याची अंमलबजावणी करताना डावा उजवा असा भेदभाव न करता प्रशासनाने ठोस कारवाई करावी असेही म्हस्के यांनी नमूद केले. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, नगरसेवक भरत चव्हाण, अतिरिक्त आयुक्त 1 राजेंद्र  अहिवर,  अतिरिक्त आयुक्त 2 समीर उन्हाळे, उपायुक्त मनीष जोशी, ओमप्रकाश दिवटे, अशोक बुरपल्ले यांच्यासह सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुकत, विविध विभागाचे अधिकारी,  ‍विविध सोसायट्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थीत होते. 
आजच्या जनसंवादात तब्बल 27 अर्ज प्राप्त झाले. ठाणे स्टेशन  परिसर फेरीवाला मुक्त करा, नागरिकांसाठी फूटपाथ मोकळे करणे, शहरातील विविध ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी धूर फवारणी करणे, अशा स्पष्ट सूचना महापौर यांनी प्रशासनाला दिल्या.  महापालिका कार्यक्षेत्रातील गटार, नाले व सार्वजनिक ठिकाणच्या साफसफाईचा प्रश्न उपस्थीत करण्यात आला होता. याबाबत केवळ तक्रारीच्याच ठिकाणी कारवाई न करता संपूर्ण महापालिका क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी कचऱ्याची समस्या आहे, तेथे तातडीने कार्यवाही करुन आवश्यकतेनुसार धूर व औषध फवारणी करण्याबाबत प्रभावी कार्यवाही करावी. तसेच रस्ता रुंदीकरणात वा इतर प्रकल्पामध्ये बाधीत झालेल्यांचे पुनर्वसन करताना सिध्दार्थनगर येथील बीएसयूपी योजनेतील नागरिकांना कायमस्वरुपी घरे देण्याबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी असे आदेश महापौर ‍दिले.  घोडबंदर रोडवरील ऋतू इन्क्लेव्ह येथील नाले साफसफाई, उघडे असलेले गटार, पार्कवुड येथील सांडपाण्याचा प्रश्न, उद्यान साफसफाई, बोअरवेलचे काम करणे व परिसरातील रस्ते सफाई आदी विषय या सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थीत केले. या समस्यांची तातडीने दखल घेवून संबंधित विभागाची तात्काळ पाहणी करण्याचे आदेश महापौरांनी यावेळी दिले.
अस्तीत्वातील झाडांना चौथरा बांधणे, अनधिकृत वृक्षतोड थांबविणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, भटक्या कुत्रयांचे निर्बीजीकरण करणे, प्लॅस्टीकवर बंदी आणणे, सेफ्टी टँक साफसफाईसाठी मनुष्यबळाचा वापर न करता यंत्राचा वापर करणे आदी महत्वपूर्ण बाबींकडे म्युज फाऊंडेशनच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले. महापालिका नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्याचे काम करीत असते, परंतु त्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करणे गरजेचे महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी सांगितले.  मार्च महिन्यातील तिसरा महापौर जनसंवाद 16 मार्च 2020 रोजी महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात होईल. नागरिकांनी आपल्या नागरी समस्या लेखी स्वरुपात दोन प्रतीत सकाळी 10.30 ते 11.00 या कालावधीत सादर कराव्यात असेही महापौर नरेश म्हस्के यांनी जाहीर केले.
दुस-या महापौर जनसंवादासही नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. काही तक्रारींचे निवारण हे तात्काळ करण्यात आले, तर काही तक्रारी संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आल्या. महापौर व  अधिकारी यांच्यासमोर आपली तक्रार मांडता आली याबद्दल नागरिकांनी महापौर नरेश म्हस्के यांचे आभार व्यक्त केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com