वाडा पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेचे योगेश गवा तर उपसभापती पदी राष्ट्रवादीचे जगदीश पाटील
वाडा
वाडा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाकरिता झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा निर्विवाद विजय झाला असून सभापती पदी शिवसेनेचे योगेश गवा तर उपसभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश पाटील यांची निवड करण्यात आली. आज १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीत शिवसेनेकडून सभापती पदासाठी योगेश गवा यांनी तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.भाजपकडून सभापती पदासाठी सुवर्णा पडवले व उपसभापती पदासाठी कृपाली पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते .
ऐनवेळी दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणुक बिनविरोध होऊन शिवसेनेचे योगेश गवा यांची सभापती पदी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वाडा पंचायत समितीत शिवसेना 4,राष्ट्रवादी काँग्रेस 4,भाजप 2 मनसे व अपक्ष प्रत्येकी एक असे एकूण बारा संख्याबळ असून अपक्ष उमेदवार सागर ठाकरे यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीची सदस्य संख्या 9 इतकी झाली. सभापती पदी गवा व उपसभापती पाटील यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. विशेष सभेचे अध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अर्चना कदम यांनी काम पाहिले.
योगेश गवा हे गालतरे गणातुन तर जगदीश पाटील हे आबिटघर गणातुन निवडून आले आहेत. नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, आमदार शांताराम मोरे, जिल्हा परिषदेचे गटनेते नरेश आकरे, उपजिल्हाप्रमुख सुनिल पाटील, तालुका प्रमुख उमेश पटारे,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रोहिदास पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते निखिल पष्टे, अमिन सेंदु, कॅाग्रेसचे वाडा तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, प्रा.धनंजय पष्टे, अरूण पाटील, अरूण अधिकारी,सचिन पाटील, निलेश पाटील वाड्याच्या नगराध्यक्षा गीतांजली कोळेकर आदींनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या