नवी मुंबई पालिका निवडणुकीत शेकाप ताकदीने उतरणार
मुंबई
देशातील एक श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय शेतकरी कामगार पक्ष ताकदीने उतरणार आहे. शेकाप, मित्र पक्ष व संघटनांच्या साथीने सर्व १११ जागा लढविण्याची आखणी करीत असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
घराणेशाही, दूरदृष्टी व विकास दृष्टिकोनाचा अभाव, नियोजनात शून्य जन-सहभाग यामुळे शहर बकाल होत चालले आहे, शहरावर ठेकेदार व कंत्राटदारांचे वर्चस्व आहे. वकूब नसलेल्या लोकप्रतिनिधींमुळे शहरात आयुक्त टिकत नाहीत. प्रशासनात गोंधळ वाढला आहे व प्रशासन दिशाहीन झाल्यामुळे, शहराचा विकास ठप्प झाला आहे. स्वतःचे धरण असूनही अनेक भागात पाणीपुरवठयाच्या तक्रारी कायम आहेत. आरोग्य व्यवस्था आजारी आहे. मरण पंथाला लागली आहे. ज्यांनी हे शहर वसवण्यासाठी आपल्या जमिनी दिल्या त्या कुटुंबात आज फसवणुकीची भावना आहे. काही ठिकाणी तर स्मशान ही देखील मोठी समस्या बनली आहे.
या शहराच्या निर्मितीत आमचा, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. एका अर्थाने शेका पक्ष या शहराचा शिल्पकार म्हणून ओळखला जातो. अशावेळी या शहराला वैभव व स्थानिकांना व नागरिकांना मोफत शिक्षण, मोफत आरोग्य सुविधा पुरवून शहर सुखी व समाधानी करून देण्याच्या निर्धाराने आम्ही, शेका पक्ष या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरत आहोत. या शहराचा शिल्पकार शेका पक्ष आता शहराला योग्य दिशा देण्यासाठी मोठया संख्येने आपले नगरसेवक निवडून आणण्यासाठी मतदारांचा कौल मागणार आहे, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
या शहरासाठी ज्यांच्या जमिनीचा घास घेण्यात आला त्या शेतकऱ्यांचा निर्णायक संघर्ष उभारून शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला देण्याची महत्वाची ऐतिहासिक जबाबदारी शेकाप ने यशस्वी पार पाडली आहे. शेका पक्षाच्या स्थानिक व राज्य स्तरीय नेत्यांनी शहराच्या आखणीत, नियोजनात व अंमलबजावणीत प्रभावी योगदान दिले आहे. त्या शहराचे बकाल स्वरूप आम्हाला पाहताना वेदना होत आहेत. बागा आहेत पण निगराणी नाही. इस्पितळे आहेत पण सोयी नाहीत. अंतर्गत रस्ते खराब आहेत. बसेस आहेत पण जनतेला हवेत तसे मार्ग नाहीत. रेल्वे स्टेशन भव्य आहेत पण स्टेशनावर बाहेर बकालपणा तसाच शाबूत आहे. दिखाऊपणा आहे पण शहरात प्राण नाही व लोकांत समाधानही नाही.
शहर सुंदर व सुविधापूर्ण करण्यासाठी दूरदृष्टी व जनसहभाग हा विकासाचा दृष्टिकोन घेऊन आम्ही मतदारांना सामोरे जाऊ. तीन लाख वस्तीला एक हॉस्पिटल या न्यायाने आणखी दोन भव्य व सर्व सोयींनी परिपूर्ण इस्पितळे देण्याची आमची भूमिका व त्याच्या जोडीने वस्ती पातळीवर उपचार केंद्र (मोहल्ला क्लिनिक) निर्माण करून मोफत आरोग्य सुविधा व केजी ते पीजी मोफत शिक्षण, महिला आणि विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास हा आमचा वादा असेल. निवडणुकीच्या - प्रचाराच्या निमित्ताने ही भूमिका घराघरात आम्ही पोहोचविणार आहोत, कारण या श्रीमंत शहरात शिक्षण व आरोग्य आता गरिबांना परवडत नाही हे दाहक वास्तव आहे.त्याशिवाय गावठाण विकास व पुनर्विकासाचे अडथळे दूर करणे हे आमच्या जाहीरनाम्यातील महत्वाचे वचन असल्याची माहिती पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात जाहीर करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या