संसर्ग करोनाचा आणि अंधश्रद्धेचाही...
- हमीद दाभोलकर
डॉ नरेंद्र दाभोलकर म्हणत असत त्या प्रमाणे, ‘जिथे अध्यात्म संपते तेथे विज्ञान सुरु होते’ हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीत धर्मकारण करणाऱ्या आपल्या केंद्र सरकारनेदेखील करोनाचा प्रसार रोखण्यासाठी विज्ञानाचीच वाट चोखाळली आहे. आता आपली पाळी आहे. करोनाच्या विषयी कोणतीही अंधश्रद्धा आणि अफवेला आपण स्वत: बळी पडणार नाही, आपण त्याचा प्रचार करणार नाही आणि शक्य तेथे त्याचा विरोध करून योग्य माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणे ह्या गोष्टी आपण कटाक्षाने केल्या पाहिजेत.
------------
चीनची भिंत भेदून करोना विषाणू जगभरात पसरला. साथीच्या रोगाचे शास्त्र आणि पुर्वानुभव लक्षात घेता येत्या काही महिन्यांत करोनाचा संसर्ग जगभरात आणखी वाढेल आणि मग हळूहळू त्यावर नियंत्रण येईल असे एकंदरीत चित्र दिसते आहे. मात्र ज्या वेगाने करोनाचा विषाणू जगभरात पसरतो आहे त्या पेक्षा कितीतरी अधिक वेगाने करोनाबद्दलच्या अफवा आणि अंधश्रद्धा समाजात पसरत आहेत. सद्यस्थितीत सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरलेल्या "करोना' या संसर्गजन्य आजारावर शास्त्रीय दृष्टिकोनातील उपायांमधून नियंत्रण मिळविण्याऐवजी कर्मकांडाच्या मार्गाचा उपयोग करणाऱ्यांचे पेव समाजात फुटले आहे.
आदिम काळात ज्यावेळी एखादा आजार कसा होतो याची माहिती मनुष्याला नव्हती त्यावेळी त्या आजाराबद्दलची भीती,अज्ञान अंधश्रद्धा समाजात पसरणे आपण समजू शकतो, मात्र विज्ञान इतके प्रगत झालेले असतानाही आजच्या प्रगत समाजात जर त्याच स्वरूपाचे अज्ञान, अंधश्रद्धा आणि अफवा आजही दिसत असतील तर हा किती मोठा विरोधाभास आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर करोना उपचारांच्या विषयी केल्या गेलेल्या दाव्यांमधील अवैज्ञानिक दावे कोणते,समाजाला अशाप्रकारच्या दाव्यांची भुरळ कशामुळे पडते आणि हे टाळायचे असेल तर नेमके काय करायला हवे या सगळ्या गोष्टी समजून घेणे महत्वाचे आहे.
सुरुवात ‘गो करोना.... करोना गो.....’ या केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या घोषणेने... केवळ भारतातच नाही तर जगभरात या घोषणेचे हसे झाले. जणू एखादा मंत्र मारून करोनाचा विषाणू जाणार आहे अशा थाटात मंत्रीमहोदय घोषणा देत होते. आंबेडकरी विचारांचे तथाकथित वारसदार असलेल्या केंद्रीय मंत्र्यांकडून इतके हास्यस्पद वर्तन अजिबात अपेक्षित नाही. मानस शास्त्रात ‘विशफुल थिंकिंग’ नावाचा एक प्रकार असतो. सामान्यपणे लहान मुलांच्या मध्ये अशा प्रकारचा विचार करण्याची पद्धत दिसून येते. यात आपण एखादा विचार मनात आणला किवा मनाशी मोठ्याने म्हंटले तर प्रत्यक्षात तसेच होते असे त्या वयातील मुलांना वाटत असते. ‘गो करोना ...करोना गो...’ ही अशा स्वरुपाची घोषणा आहे. देशभरात सामाजिक न्याय स्थापन करण्याची संविधानिक जबाबदारी असलेल्या व्यक्तीकडून असे वर्तन अत्यंत असमर्थनीय आहे.
दुसरा असाच प्रकार लखनऊमध्ये घडला तो ‘गोमुत्र पार्टी’चा. चक्रपाणी नावाच्या कोणी स्वयंघोषित संताने या पार्टीचे आयोजन केले होते. त्यात करोना विषाणूची एक प्रतिकृती करून त्याला गोमुत्र पाजण्यात आले. तसेच उपस्थित सर्वांनी देखील गोमुत्र प्राशन केले. गोमुत्रामुळे करोनापासून आपल्याला मुक्ती मिळेल, असा दावा ह्या वेळी करण्यात आला. जगातील सर्व समस्यांवर ‘गोमुत्र’ हे एक हुकमी रामबाण उपाय आहे असा दावा सध्या आपल्या देशात सर्रास केला जातो आणि त्याचा थेट संबंध धार्मिक श्रद्धेशी असल्याने त्यावर आक्षेप घेणे म्हणजे धर्मद्रोह करणे असे काहीसे समीकरण सध्या आपल्याकडे रुजू लागले आहे. हे सर्व आपल्या देशाला परत आदिमयुगाकडे घेऊन जाण्याचे प्रकार आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे.
अग्निहोत्राने करोनाचा नाश होतो असा दावा देखील औरंगाबाद येथील अग्नी होत्र विश्व फाऊंडेशनमार्फत करण्यात आला. हे काय कमी होते म्हणून उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे करोनोविषयी जी पत्रकार परिषद घेण्यात आली त्यात अग्निहोत्राचे प्रात्यक्षिक देखील करून दाखवण्यात आले. अयोध्येमधील एका संत परमहंस ह्यांनी यज्ञ आणि होम हवन करून करोनाला आपण पळवून लावतो असे जाहीर केले.अशा स्वरूपाचे अशास्त्रीय दावे करण्यात सर्वधर्मीय बाबा, बुवा, मौलवी, पाद्री सहभागी झाल्याचे दिसतात. दापोडी येथील एका स्वयंघोषित धर्मगुरूने करोनावर उपाय म्हणून जादुई उपचार आपल्याला मिळाल्याचा दावा केल्याचे समोर आले आहे. मध्यपूर्वेतील देशांमध्ये करोनाचा प्रसार रोखला जावा म्हणून काही मौलवी अशाच स्वरूपाचे दावे करीत असल्याचे समोर येत आहे.
सगळ्यात विरोधाभासाचा भाग हा की विज्ञानवादी समजले जाणारे पाश्चिमात्य देशही अशप्रकारच्या अफवांना आणि अंधश्रद्धांना बळी पडताना दिसत आहेत. कांदा आणि लसूण खाल्याने करोनाचा प्रसार थांबवता येतो असा एक अवैज्ञानिक समज पाश्चात्य जगात पसरल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने करोना आजाराविषयी ज्या अफवांची सूची जाहीर केली आहे त्यात कांदा आणि लसूण ह्यांचा करोना संसर्गाशी काहीही संबंध नाही असे स्पष्ट केले आहे.
ज्या वेळी संसर्गजन्य आजार कशामुळे होतात ह्या विषयी मानवाला माहिती नव्हती त्यावेळी भितीतून अथवा नाईलाजाने अशा स्वरूपाच्या कर्मकांडांचा वापर केला जाणे आपण समजू शकतो. आज ‘स्मॉलपॉक्स’ सारखे काही संसर्गजन्य आजार पृथ्वीवरून पूर्णपणे नामशेष करण्यात मानव यशस्वी झाला आहे. अशा आजच्या कालखंडात पूर्वापार चालत आलेल्या अशास्त्रीय बाबी बाजूला सारून आपण विज्ञानवादी विचाराची कास धरायला हवी. ‘स्मॉलपॉक्स’ ह्या संसर्गजन्य आजाराला आजही आपल्या इथे ‘देवीचा आजार’ असे म्हंटले जाते. ‘देवी’ कोपली तर हा आजार होतो हा समाज इतका दृढ होता की त्या आजाराचे नाव देखील देवीचा आजार असे पडले आणि अजूनही ते तसेच वापरले जाते. प्रत्यक्षात ह्या आजारावर मात करण्यासाठी मानवजातीला जी मदत झाली ती विज्ञानाची झाली. देवीच्या आजारावर लस शोधण्यात आली. जगभरातील सर्व देशांनी ह्या विषयी एक सहमती निर्माण केली आणि त्यातून सार्वत्रिक लसीकरण करून देवीच्या आजारावर आपण मात करू शकलो. १९८० साली जगभरातून देवीचा आजार नामशेष झाला.पोलिओचे उदाहरण देखील अशाच प्रकारचे अलीकडचे उदाहरण आहे.
करोनाच्या प्रसारावर आपल्याला जर मात करायची असेल तर आपल्याला कोणत्या रस्त्याने जावे लागेल ते देवी आणि पोलिओच्या उदाहरणातून अगदी स्पष्ट आहे. "सार्स'सारखी यापूर्वीची साथ किवा "स्वाईन फ्लू'ची साथ आटोक्यात आणण्यासाठी देखील विज्ञानाने केलेल्या प्रयत्नातूनच आपल्याला मार्ग सापडलेला होता. करोनाचा इलाजही अग्नीहोत्र, यज्ञ, मंतरलेले पाणी किवा गोमुत्र या पैकी कशातूनच नाही तर प्रयोगशाळेत केलल्या शास्त्रीय प्रयोगातूनच मिळणार आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे वैज्ञानिक ह्या आजाराच्या निर्मिती, प्रसार आणि उपचार यामधील कार्यकारण भावाचा अभ्यास करणार आहेत. त्यामधून काही ठोकताळे बांधून, प्रयोग करून,त्याचे निष्कर्ष तपासून मग त्यातून उत्तर शोधले जाईल. विज्ञानाची ही प्रश्न सोडवण्याची पद्धत आणि यज्ञ, गोमुत्र अग्निहोत्र यासारख्या पद्धतींमधील मुलभूत फरक ह्या निमित्ताने आपण समजून घेतला पाहिजे. ह्या मध्ये काही चुका होतील, काही निष्कर्ष चुकतील, काही वेळा लागलेल्या शोधांचा फायदा चुकीच्या पद्धतीने नफेखोरीसाठी केला जाईल. असे असले तरी करोनावर उपचार शोधण्याचा मार्ग हा विज्ञानाच्याच मार्गाने आपल्याला समजणार आहे हे आपण समजून घेतले पाहिजे.
‘जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरु होते’ असे एक गूढ सदृश वाक्य आपल्याला अनेकदा ऐकवले जाते. डॉ नरेंद्र दाभोलकर म्हणत असत त्या प्रमाणे इथे प्रत्यक्षात, ‘जिथे अध्यात्म संपते तेथे विज्ञान सुरु होते’ हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीत धर्मकारण करणाऱ्या आपल्या केंद्र सरकारनेदेखील करोनाचा प्रसार रोखण्यासाठी विज्ञानाचीच वाट चोखाळली आहे. आता आपली पाळी आहे. करोनाच्या विषयी कोणतीही अंधश्रद्धा आणि अफवेला आपण स्वत: बळी पडणार नाही, आपण त्याचा प्रचार करणार नाही आणि शक्य तेथे त्याचा विरोध करून योग्य माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणे ह्या गोष्टी आपण कटाक्षाने केल्या पाहिजेत. हे आपण केले तरच करोनाच्या निमित्ताने होणाऱ्या अफवा आणि अंधश्रद्धांचा प्रसार आपण थांबवू शकू.
(लेखक : हमीद दाभोलकर hamid.dabholkar@gmail.com
"अंनिस' चे कार्यकर्ते आहेत. संपर्क - ९८२३५५७५३१)
0 टिप्पण्या