२४ तास कार्यरत असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता ?
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आता 159 वर
मुंबई
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात २७ मार्च रोजी 65 वर्षांच्या एका वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा राज्यातील पाचवा बळी आहे. त्याच दिवशी मुंबईतील खासगी रुग्णालयात एका 85 वर्षीय संशयित कोरोना डॉक्टरचा मृत्यू झाला. त्यांचे 2 नातेवाईक इंग्लंडहून परतलेले आहेत. या रुग्णाला मधुमेह होता. तसेच त्यांना पेसमेकरही बसवलेला होता. त्यांचे निदान खासगी प्रयोगशाळेत झालेले असल्याने खातरजमा होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव सुरूच असून २८ मार्च रोजी सकाळी मुंबईत पाच तर नागपुरात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. यामुळे राज्यातील रुग्णांचा आकडा आता 159 वर पोहोचला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार 24 तास कार्यरत असलेल्या डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाला प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा विचार करीत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
शुक्रवारी राज्यात एकाच दिवशी तब्बल 28रुग्ण आढळले. या रुग्णांत इस्लामपूरमधील बाधित रुग्णांच्या संपर्कातील 15 व्यक्तींचा, तर नागपूरमध्ये गुरुवारी आढळलेल्या रुग्णांच्या चार सहवासितांचा समावेश आहे. मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी 2 रुग्ण, तर पालघर, कोल्हापूर, गोंदिया आणि पुण्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. एक रुग्ण गुजरात राज्यातील आहे. आजवर राज्यात 24 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे हाेऊन घरी गेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यभरात 22,118 खोल्यांची सज्जता केली आहे. तेथे ठिकाणी 55,707 खाटांची सोय होईल.
राज्यातील आकडेवारी : पिंपरी चिंचवड 13, पुणे 18, मुंबई 56 (मृत्यू 4), सांगली 24, नागपूर 10, ठाणे 5, यवतमाळ 4, अहमदनगर 3, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली प्रत्येकी 6 – मृत्यू 1, सातारा, पनवेल प्रत्येकी 2, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई-विरार, पुणे ग्रा., सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, गोंदिया, गुजरात प्रत्येकी 1.
18 जानेवारीपासून वेगवेगळ्या अलगीकरण कक्षांत 3,493 जणांना भरती केले होते. पैकी 3,059 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. राज्यात 24 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडले आहे. सध्या राज्यात 16,513 व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून 1045 जण संस्थात्मक क्वॉरंटाइनमध्ये आहेत.
राज्यातील कोरोना व्हायरसची आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी मंत्रालयात कोरोना नियंत्रण कक्ष स्थापण्यात आला आहे. 11 आयएएस अधिकाऱ्यांवर त्याची जबाबदारी सोपवली आहे. मुख्यमंत्री रोज सकाळी त्यांच्याशी बैठक घेत आहेत. कोरोना व्हायरससंदर्भात नागरिकांना माहिती देण्यासाठी +912026237394 हा विशेष नंबर तयार करण्यात आला आहे. चॅटबॉटच्या माध्यमातून सध्या इंग्रजीत माहिती दिली जात आहे. लवकरच मराठीतही माहिती मिळणार आहे.
0 टिप्पण्या