धनवान रुग्णांसाठी खासगी हॉटेल्समध्ये 300 खोल्या आरक्षित
मुंबई
कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने धनवान रुग्णांसाठी विमानतळ भागातील जुहू, अंधेरी, सांताक्रूझ येथील चार खासगी हॉटेल्समध्ये 300 खोल्या आरक्षित केल्या आहेत. लीला हॉटेलमध्ये खोल्या आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पालिकेच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जाणार आहे. मात्र, ही सेवा सशुल्क असणार आहे. संबंधितांना यात 50 टक्के सवलत दिली जाईल. तसेच आवश्यकता भासल्यास त्यात वाढ करण्यात येईल, अशी माहिती पालिका सहाय्यक आयुक्त मनीष वाळुज यांनी दिली.
परदेशातील प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जात आहे. यावेळी संशयित आढळून येणाऱ्यांना रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवले जाते. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयासह कुर्ला, भाभा, राजावाडी, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअरसह सेव्हन हिल्समध्ये विशेष तीनशे खाटा यासाठी राखीव ठेवल्या आहेत. मात्र, अनेकदा परदेशातून प्रवासी येथे राहण्यास नकार देतात. त्याकरिता पंचतारांकित हॉटेल्समध्ये आतापर्यंत 70 खोल्या आरक्षित झाल्या आहेत. येथील संशयितांच्या देखरेखीसाठी पालिकेच्या आरोग्य विभागाचा एक डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी कार्यरत असतील, असे वळुज सांगितले.
परदेशातून येणारी व्यक्ती व त्यांच्या निकट असलेल्या व्यक्ती अशा दोन प्रकारातून सध्या भारतात कोरोनाचा प्रसार होत आहे. महामुंबईत आतापर्यंत 14 रुग्ण आढळून आले आहेत. तर 68 जण कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने महामुंबईत यामुळे भीतीचे वातावरण आहे. या परिस्थितीमुळे सतर्क झालेल्या पालिकेने परदेशातून प्रवास करून मुंबईत आलेल्या प्रवाशांना किंवा त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनी घरातच एका वेगळ्या खोलीत 14 दिवस थांबावे, अशा सूचना आहेत.
0 टिप्पण्या