अखेर "त्या" बोगस डॉक्टरांची कारागृहात रवानगी
ठाणे
कळवा पूर्व भागातील भास्करनगर, वाघोबानगर, पौडपाडा या परिसरातील झोपडपट्टीमध्ये काही बोगस डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करत असल्याबद्दलची तक्रार ठाणे गुन्हे शाखेकडे आली होती. मेडिकल कौन्सिल ऑफ महाराष्ट्रच्या अधिकार्यांसमवेत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारून वैद्यकीय व्यवसाय करणारे बोगस डॉक्टर आलोक सिंह, रामजित गौतम, गोपाल विश्वास, रामतेज प्रसारद, सुभाषचंद्र यादव, जयप्रकाश विश्वकर्मा, दिपक विश्वास आणि सत्यनारायण बिंद या आठ डॉक्टरांना 7 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यांच्याकडे अॅलोपॅथी आणि आयुर्वेदिक औषधे, सलाईन, अँटीबायोटिक्स, वेदनाशामक औषधे तसेच स्टिरिऑईड औषधांचे आठ बॉक्स मिळाले होते. कोणतेही वैद्यकीय प्रशिक्षण न घेता वैद्यकीय व्यवसाय करणार्या या बोगस डॉक्टरांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याने या सर्वांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
न्यायालयाने त्यांना 11 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांना 25 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. या आरोपींपैकी रामतेज मोहन प्रसाद याने न्यायालयात जामिनाकरिता अर्ज केला असता सरकारी वकिल रेखा हिवराळे यांनी त्याला विरोध केला. या आरोपींकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसताना त्यांनी रुग्णांची फसवणूक करून ते त्यांच्या जीवाशी खेळत आहेत. या आरोपींना जामिन मंजूर केल्यास ते इतर ठिकाणी अजून पुन्हा व्यवसाय करून गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळू शकतात. रुग्णांना त्यांच्या विरोधातील साक्ष देण्यास मज्जाव करू शकतात. त्यामुळे त्यांना जामीन देण्यात येऊ नये. त्यांनी जे प्रमाणपत्र कोलकता येथील दिले आहे ते खरे आहे, परंतु डॉक्टर ही पदवी लावण्यास त्यांना संस्थेने मनाई केली असल्याचेही अॅड. हिवराळे यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्यामुळे या आठही डॉक्टरांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
0 टिप्पण्या