४९ वर्षीय योगिता रघुवंशी आजही ट्रक चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात
जागतिक महिला दिन निमित्त त्यांच्या कर्तुत्वाला सलाम
शहरात महिलांनी दुचाकी - चारचाकी चालवणे ही फॅशन झाली आहे. मात्र गाव-खेड्याकडे आजही अनेक महिला यापासून दूरच आहेत. त्यातही खेडेगावात अंधश्रद्धेपोटी महिलांच्या हातात चारचाकीचं स्टेअरिंग येणे कठीणच झालंय. मात्र याला अपवाद ठरली आहे. योगिता रघुवंशी. ट्रकचा स्टेअरिंग बहुतांश पुरुषांच्याच हातात आहे. ट्रक ड्रायव्हर म्हणजे पुरुषांचीच मक्तेदारी आहे. अशा स्थितीत योगिता रघुवंशी ही महिला आपल्या मुलांच्या संगोपनासाठी ट्रक ड्रायव्हर बनली आहे. मागील पंधरा वर्षापासून हे काम ती करीत आहे. यामध्ये अनेकवेळा जीवावर बेतण्याचे प्रसंग आले तरी न डगमगता आजही ती ट्रकचे स्टेअरिंग उत्तमरित्या सांभाळत आहे.
भोपाळ येथे राहणारी योगिता रंघुवंशी यांचा पती ट्रक ड्रायव्हर होता. मात्र एका दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. २००३ मध्ये पती राजबहादूर सिंह यांच्या चितेला अग्नी देऊन घरी परतत असतानाच भावाचाही मृत्यू झाला. अशा वेळी कुटुंबांची जबाबदारी अचानक शिरावर आली. मात्र त्याला न डगमगता योगिता यांनी ट्रक ड्रायव्हर बनून कुटुंबाचे संगोपन केले. योगिता रघुवंशी यांचेकडे कॉमर्स आणि कायद्याची डिग्री आहे. याशिवाय त्यांनी ब्युटिशियनचाही कोर्स केला आहे. मात्र झटपट आणि अधिक पैसा कमविण्याकरिता त्यांना ट्रकचे स्टेअरिंगच योग्य वाटले आणि त्यांनी तो मार्ग पत्करला. या व्यवसायावर दोन मुलांचे संगोपन करणाऱ्या या मातेने आजपर्यंत अर्ध्याहून अधिक भारतातील राज्ये पालथी घातली आहेत.
या दरम्यानच हिन्दी, इंग्रजी, मराठी, तेलगु, गुजराती भाषा शिकल्या. ट्रक चालवतांना कधी रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यावर तर कधी रस्त्याच्या किनारी स्वत:च स्वंयपाक बनवून खाणे, वेळ झालीतर ट्रकमध्येच झोपणे अशी कामे योगीता रघुवंशी एकट्याच आजही करत आहेत.
४९ वर्षीय योगिता रघुवंशी यांनी ट्रक ड्रायव्हर ही पुरुषांची मक्तेदारी मोडून नवीन पायंडा पाडला त्यांच्या कार्याला जागतिक महिला दिनी सलाम
साभार : नवभारत टाईम्स, इंडिया टाईम्स
0 टिप्पण्या