शासनमान्यता प्रयोगशाळांना कोरोना व्हायरस तपासणीसाठी परवानगी द्यावी
महापौर नरेश म्हस्के यांचे आरोग्य विभागास पत्र
ठाणे,
जगभरामध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव होत असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने आपल्या देशात या आजाराचा बळी गेलेला नाही. परंतु संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी उदभवलेल्या एच 1 एन 1, स्वाईन फ्ल्यू तसेच टी.बी या आजारावर तपासण्या करणाऱ्या शासनमान्य प्रयोगशाळा आहेत. परंतु त्यांना कोरोना व्हायरसची तपासणी करण्यासाठी शासनाची मान्यता नाही. अशा शासनमान्य प्रयोगशाळांची वैद्यकीय मानकानुसार गुणवत्ता तपासून शासनाच्या आरोग्य विभागाने त्यांना कोरोना व्हायरस तपासणीसाठी मान्यता द्यावी असे पत्र महापौर नरेश म्हस्के यांनी संचालक आरोग्यसेवा पुणे यांना दिले आहे.
परदेशातून भारतात येणारे बहुतांशी प्रवाशी हे मुंबई येथे येत असतात. विमानतळावरच या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात येते, यामध्ये संश्यित आढळून आल्यास मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येते. परंतु या रुग्णालयातील संशयित रुग्णांची संख्या लक्षात घेता वेळेत तपासण्या होणे गैरसोईचे होत आहे. या तपासण्या करण्यासाठी रुग्णांना सात ते आठ तास थांबावे लागते. त्यामुळे अनेक रुग्ण हे तपासणी न करताच निघून जात आहेत, यामुळे हा आजार फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई -ठाणे येथे अनेक नामांकित वैद्यकीय प्रयोगशाळा असून या प्रयोगशाळांच्या माध्यमातून शासनमान्यतेनुसार एच 1, एन 1, स्वाईन फ्ल्यू, टी.बी सारख्या आजारांच्या तपासण्या करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे बाधित रुग्णांच्या वेळेत तपासण्या होवून वेळेवर औषधौपचार होण्यास मदत झाली आहे. याच धर्तीवर सध्याच्या कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी नामांकित संस्थांनी तयारी दर्शविली आहे.
यासाठी त्यांना शासनाची मान्यता आवश्यक आहे. अशा संस्थांची वैद्यकीय मानकानुसार गुणवत्ता तपासून त्यांना परवानगी दिल्यास कोरोना व्हायरसच्या तपासण्या वेळेत पूर्ण होणे शक्य होणार आहे. तसेच याचा ताण कस्तुरबा रुग्णालयावर येणार नाही यासाठी नामांकित प्रयोगशाळांना शासनाच्या आरोग्य विभागाने आवश्यक ती परवानगी द्यावी अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रान्वये केली आहे. अशा प्रयोगशाळांना शासनाने मान्यता दिल्यास सर्वच ठिकाणी तपासण्या होतील व एकही संश्यित रुग्ण या तपासण्यापासून वंचित राहणार नाही असेही या पत्रात नमूद केले आहे. या मागणीचा शासन दरबारी विचार होवून संबंधित विभाग सकारात्मक निर्णय घेईल असा आशावादही महापौरांनी व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या