मनाई आदेश असतानाही पालेभाज्या पिकवण्यासाठी सांडपाण्याचा वापर
ठाणे
ठाणे शहरात रेल्वे रुळाशेजारी तसेच खुल्या जागेत पालेभाज्या पिकविण्यासाठी नाल्यातील सांडपाणी वापरले जात असल्याची बाब सातत्याने पुढे येत आहे. यााबाबत महापालिका अधिकाऱ्यांनी एक विशेष बैठक घेतली होती. त्यावेळी अशी शेती करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी दिले होते. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेचे पहिले कर्तव्य आहेत, नागरिकांच्या जीवाशी खेळणा-या व अशा बेफिकीरपणे भाजीविकेत्यांवर कारवाई करण्याबाबत महापालिकेने कोणतीही कसूर करु नये अशा सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे भाजीमळे उद्ध्वस्त केले होते. असे असले तरी अवघ्या दोन महिन्यात महापालिका प्रशासनाच्या या कारवाईत खंड पडला आहे. त्यामुळे कळव्यातील मफतलाल परिसरात सांडपाण्याच्या साहाय्याने पिकवले जाणारे हे भाजीमळे पुन्हा फुलले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
रेल्वे ट्रॅकजवळच्या मोकळ्या जागेत तसेच शहराच्या बहुतांश ठिकाणी भाजीचे मळे आहेत, याठिकाणी बोअरवेल असल्याचे दाखवून प्रत्यक्षात मात्र पिकांसाठी मलमूत्रमिश्रीत सांडपाणी तसेच गटाराचे पाणी देण्यात येते. मानवी मलमूत्र हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे, कळव्यातील मफतलाल परिसरात तलाव असून या तलावातील पाण्याचा वापर हा अनेक जण आंघोळीसाठी तसेच कपडे धुण्यासाठी करतात. तसेच परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या घराचे सांडपाणीही या तलावात सोडल्याचे दिसून येते. त्यामुळे या तलावाचे पाणी दूषित झाले असून पाण्याला दुर्गंध येत आहे. त्यातच मफतलाल परिसरात सांडपाण्याचा वापर करून पिकणारा भाजीपाला धुण्यासाठी या दूषित पाण्याचा वापर करण्यात येत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्राचा विचार केल्यास कळवा, मुंब्रा व दिवा तसेच ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या समता नगर, गांधीनगर,सिडको, मफतलाल कंपाऊंड, परिसरात भाजीमळे असून यातून पिकविलेली भाजी ठाण्यातील विविध विभागात विकली जाते, ही भाजी पिकवण्यासाठी तसेच धुण्यासाठी सांडपाणी मिश्रीत पाण्याचा वापर केला जात आहे, अशा पध्दतीने नागरिकांच्या जीवाशी खेळून भाज्यांची लागवड केली जात आहे, याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असून कॅन्सर, पोटाचे विकार, मेंदूचे विकार या सारख्या दुर्धर आजारांना या भाज्या सेवन केल्यामुळे सामोरे जावे लागत आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून याची कसून चौकशी करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला तसेच प्रत्येक प्रभागसमितीनिहाय असलेल्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. अशा प्रकारे गलिच्छ ठिकाणी पिकविलेल्या भाज्यांची लागवड जे करीत असतील त्यांच्यावर कठोर पावले उचलून तातडीने कारवाई करण्याचे संकेतही महापौरांनी दिले असतानाही याकडे दुर्लक्ष होत असल्याने ठाणेकरांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
0 टिप्पण्या