‘विवाद से विश्वास’ योजनेची माहिती देण्यासाठी ठाण्यात आऊटरिच कार्यक्रमाचे आयोजन
ठाणे
मुख्य आयकर आयुक्त ठाणे आणि प्रधान आयकर आयुक्त ठाणे यांच्या वतीने ठाण्यातील आर नेस्ट सभागृहात प्राप्तिकर विभागाने जाहीर केलेल्या ‘विवाद से विश्वास’ या योजनेची माहिती देण्यासाठी आऊटरिच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे विभागाच्या प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्त अनुराधा भाटिया, ठाण्याचे मुख्य आयकर आयुक्त के.सी.पी. पटनायक, प्रधान आयकर आयुक्त-2 ठाणे वीर बिरसा एक्का आदी मान्यवर उपस्थित होते. केन्द्र सरकारकडून नव्याने सुरु करण्यात आलेली ‘विवाद से विश्वास योजना ’ काय आहे, त्याचा फायदा कुणाला होऊ शकतो, कराची रक्कम भरण्यासाठीची प्रक्रिया काय आहे आदी योजनेविषयीची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.
ठाणे शहरात प्राप्तिकर विवरणपत्र भरणार्यांची संख्या कमी आहे. यावर्षी 81 हजार 563 नागरीकांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरलेले नाही. अॅडव्हान्स कर भरणाही कमी झाला आहे, त्यामुळे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी यात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे अनुराधा भाटिया यांनी यावेळी सांगितले. ठाणे शहरात 81 हजार 563 नागरीक प्राप्तिकर विवरण पत्र भरत नसल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या वर्षी ठाणे कार्यालयास पाच हजार 300 कोटींचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यातील केवळ दोन हजार 400 कोटींचे लक्ष्य पूर्ण झाले असून तीन हजार कोटी बाकी आहेत. मार्च 2019 या आर्थिक वर्षात तीन हजार 300 कोटी अॅडव्हान्स कर आला होता तर एक हजार 371 कोटी सेल्फ असेसमेन्टच्या रुपात येत आहे. 82 कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे वर्ष संपण्यापूर्वी हे उद्दीष्ट पूर्ण करण्याकडे चार्टर्ड अकाऊंट्सनी लक्ष देण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी कर्मचार्यांना आवाहन केले.
0 टिप्पण्या