जिल्ह्यातील आदिवासी तरुणांना स्वयंरोजगार
बांबु पासून वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण
वाडा
जंगलामध्ये वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असून अती टिकाऊ लाकुड हद्दपार झालेला दिसत असून यामुळे भविष्यात लाकडापासून बनवलेले फर्निचरच्या वस्तू दिसेनाश्या होत आहेत. अशा परिस्थितीत टिकाऊ फर्निचरसाठी बांबू हे एक उत्तम साधन ठरत आहे. बांबु पासून टेबल, खुर्च्या, कपाट, सोपा, पलंग असे अनेक वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण आदिवासी तरुणांना वाडा तालुक्यात पाली आश्रम शाळेमध्ये देण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध होत आहे.
बांबू पासून बनविलेल्या वस्तू टिकाऊ व मजबूत असल्याने साधारण 30 वर्षे व त्यापेक्षा अधिक काळ टिकू शकतात. सध्या बांबूचा जागतिक व्यापार जवळपास 60,000 कोटी रुपयांचा असून त्यात चीन सारख्या देशाचा वाटा 50 टक्के असून भारताचा हा व्यापार 4300 कोटी रुपयांच्या घरात आहे. बांबू पासून फर्निचर बनवण्यापूर्वी त्यावर विविध प्रक्रिया करण्यात येवून बांबू फर्निचर प्रशिक्षणामध्ये बांबू पासून खिळे बनवणे, स्किन करणे, पेर काढणे, पट्टी बनवणे, बांबू सरळ करणे वाकवणे, कीट तयार करणे इत्यादी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे प्रशिक्षणार्थीना उत्पादन बनवण्याचे सखोल ज्ञान येथे दिले जाते. सदर टप्प्यामध्ये बांबूची विविध घटक एकत्र करून मुख्य फर्निचर बनवले जाते.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून व कोकण बांबू अॅंड कॅन डेव्हलपमेंट सेंटर कुडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात येत असून केंद्र सरकारकडून यासाठी विशेष अनुदान दिले जात आहे. या प्रशिक्षणाचा लाभ पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी तरुणांना मिळत असून तीन महिने प्रशिक्षण कालावधी असलेल्या या प्रशिक्षणाचा आजमितीला 97 तरुणांनी लाभ घेतला आहे व 30 मुलांचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे. या प्रशिक्षणासाठी 7 वी, 8 वी इयत्ता उत्तीर्ण व 18 ते 45 वयोमर्यादेची अट असून याठिकाणी वाडा, जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणू तालुक्यातील आदिवासी तरुण पाली येथे प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात. या बांबू पासून बनवलेल्या वस्तूंना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असून लवकरच त्याची खरेदी विक्री सुरू होणार आहे. तसेच कोकण बांबु प्रशिक्षण हे येत्या काही दिवसात डहाणू येथे सुरू होणार आहे. कारण पाली हे डहाणू पासून दुर असल्याने त्या भागातील प्रशिक्षणार्थींना वेळेवर पोहोचण्यास अडचण येत आहे. म्हणून काही दिवसांत डहाणू येथे कोकण बांबु अॅंड कॅन डेव्हलोपमेंट सेंटर कुडाळच्या माध्यमातून बांबु फर्निचर प्रशिक्षण सुरू होणार आहे.
0 टिप्पण्या