मी पक्ष का सोडला याचं कारण साहेबांना माहिती आहे - गणेश नाईक
नवी मुंबई
“मी २० वर्ष राष्ट्रवादी पक्षासाठी काम केलं. आजपर्यंत मला शरद पवार काहीही बोललेले नाहीत. मी पक्ष का सोडला याचं कारण त्यांनाही माहिती आहे. मी काय गमावलं आहे याची मला कल्पना आहे,” असं गणेश नाईक यांनी म्हटलं आहे. मला आयकर, सक्तवसुली संचलनालय किंवा कोणत्याही गुंडाची भीती नाही. माझे हात स्वच्छ आहेत असंही ते म्हणाले आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या गणेश नाईक यांनी आपण पक्ष सोडण्याबद्दल पहिल्यांदाच जाहीर वाच्यता केली आहे.
“तुम्ही पक्षासाठी २० वर्ष काम केलं आहे. पक्षाने तुम्हाला तिकीट दिलं नाही तर आम्ही सगळे पक्ष सोडणार असं पुत्र संदीप नाईक, संजीव नाईक यांनी सांगितलं होतं. त्यामुळेच आपण पक्ष सोडला,” अशी कबुली नाईक यांनी दिली आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, “राष्ट्रवादी पक्ष सोडण्याचं कारण शरद पवारांना माहिती आहे. त्यांनी अधिकाराने मला सुनावलं, तर मी गप्प बसेन”.
राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध रंगलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ठाणे जिल्ह्य़ात गणेश नाईक यांनी पक्ष संपवला असा आरोप गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. नवी मुंबईत भ्रष्टाचार आणि खंडणी नाईकांच्या आशीर्वादाने चालत असल्याचा दावाही आव्हाड यांनी केला. त्यांनी मलाही संपवण्याचा डाव आखला होता, अशी टीकाही आव्हाड यांनी केली. नाईक यांच्यामुळे ठाणे- कल्याण- डोंबिवली- अंबरनाथ आदी शहरात पक्षाची ताकद संपली असे शरद पवार यांच्या निदर्शनास आणले होते. मात्र पवार यांचा माझ्यापेक्षा जास्त नाईक यांच्यावर विश्वास होता, अशी खंतही आव्हाड यांनी व्यक्त केली.
“ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक” अशा फिल्मी स्टाइलमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेला गणेश नाईक यांनी उत्तर दिलं. “कोणी म्हणतो गणेश नाईक खंडणी बहाद्दर आहे, पण गणेश नाईकवर एक एनसीदेखील नाही. हिंमत असेल तर गणेश नाईक खंडणी बहाद्दर असल्याचे पुरावे घेऊन गुन्हा दाखल करा,” असं गणेश नाईक यांनी आव्हाडांच्या भ्रष्टाचार आणि खंडणीच्या आरोपांवर उत्तर देताना सांगितलं. गणेश नाईक यांनी यावेळी आपण मुलगा संदीप नाईकचा बळी दिला नसल्याचंही ते म्हणाले. “आपण संदीपला निवडणूक लढ म्हणून सांगितलं होतं, हे कार्यकर्त्यांना माहिती आहे,” असं यावेळी गणेश नाईक यांनी सांगितलं.
0 टिप्पण्या