करोनाचा हापूस बागायतदारांना, व्यापाऱ्यांना फटका; सुमारे १ कोटी पेट्या कोकणात पडून
मुंबई
जगप्रसिद्ध असलेला हापूस आंबा साधारण १५ मार्चनंतर बाजारात येतो आणि १५ मेपर्यंत विक्रीस असतो. यादरम्यान त्याची निर्यातही होते. पण, निर्यातीपेक्षा मुंबई, पुणे व नाशिक येथे आंब्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कोकणात साधारण ४ लाख एकरावर हापूसचे उत्पादन घेतले जाते. त्यावर जवळपास ३ ते ४ कोटी डझन आंबा तयार होतो. त्याच्या १ कोटी पेट्या मुंबई, पुणे व नाशकात विक्री करण्यासाठी बागायतदारांनी सज्ज केल्या आहेत. पण त्यांना ना महाराष्ट्रात मागणी आहे ना देशात आणि परदेशात. करोना संकटामुळे देशभरात 'लॉकडाऊन' झाल्याच्या फटका हापूस आंबा बागायतदारांनाही बसणार आहे. हापूसची आवक पूर्णपणे रखडली असून, हापूसच्या १ कोटीहून अधिक पेट्या सध्या कोकणात पडून आहेत. आंबाविक्रीबाबत आत्ताच निर्णय न झाल्यास येत्या काळात कोकणातील आंबा बागायतदार भीषण संकटात येण्याची भीती आहे. याबाबत कोकणभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी माहिती दिली. 'मागणी पूर्णपणे थांबल्याने सरकारने कापूस एकाधिकार योजनेसारखी आंब्याची खरेदी करावी. रेशनच्या दुकानात किंवा अन्य मार्गाने हे आंबे सरकारने सर्वसामान्यांना विक्री करावे', असे ते म्हणाले.
'सध्या करोनामुळे शाळा बंद आहेत. हापूसची सर्वाधिक मागणी असलेल्या मुंबई, पुणे व नाशिकमधील आठ महापालिका क्षेत्रांतील विविध शाळांमध्ये पणन मंडळाने फळबाजार उभा करावा. कोकणातील आंबा या बाजारापर्यंत पोहोचविण्यासाठी आमचे प्रतिष्ठान व बागायतदार संघ पुरवठा साखळी उभी करतील. त्यानंतर करोनासंबंधीची सर्व प्रकारची काळजी घेत हा आंबा बागायातदार त्या-त्या महापालिका क्षेत्रात विक्री करेल. ही विक्री शिस्तबद्धरितीने होईल. याची हमी व शाश्वती बागायातदार संघ घेतील. कोकणातील शेतकऱ्यांना एकवेळ कर्जमाफी नको पण ही सोय करू देणे अत्यावश्यक आहे', असेही यादवराव म्हणाले.
अशाप्रकारे कोकणातील हा फळांचा राजा शहरापर्यंत आणण्यासाठी बागायातदार तयार आहेत. पण त्यासाठी राज्य सरकारच्या पणन मंडळाने सहकार्य करावे, असे पत्र कोकणभूमी प्रतिष्ठानने कोकणचे विभागीय आयुक्त शिवाजी दौंड व पणन मंडळालाही लिहिले आहे. 'केवळ आंबाच नव्हे तर सर्वच फळांसाठी अशी संघटित बाजारपेठ सध्याच्या स्थितीत राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावी. आत्ताच याबाबत निर्णय न झाल्यास आंबा बाजार पूर्णपणे संकटात येईल', अशी भीती यादवराव यांनी व्यक्त केली. कोकणात बनून तयार असलेला ३५ ते ४० टन आंबा कृषी उत्पन्न बाजारपेठेत विक्रीला आणण्यासाठी वाहतूक परवाना देण्याची महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाची मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांनी पूर्ण केली आहे. याबद्दल संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी सरकारचे आभार मानले आहेत.
0 टिप्पण्या