तर सबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल - विराज पौणकर
ठाणे :
अन्न व औषध प्रशासन आणि ठाणे केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन यांची करोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ठाण्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर सहआयुक्त विराज पौणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. नागरिकांनी औषधालयामधून केवळ गरजेपुरतेच सॅनिटायझर खरेदी करावे आणि त्यावरील मुदतीची तारीख आणि उत्पादक क्रमांक तपासून पाहूनच खरेदी करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे कोकण विभागीय सहआयुक्त विराज पौणकर यांनी नागरिकांना यावेळी केले. करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर आणि मास्कची सर्वत्र मागणी वाढली असून या दोन्ही वस्तूंची जास्त दराने विक्री आणि त्याची साठेबाजी करताना आढळून आले तर सबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पौणकर यांनी यावेळी दिला.
तसेच नागरिकांनी सॅनिटायझरच्या खरेदीचे देयक औषधालयामधून घ्यावे. जेणेकरून सॅनिटाझरमध्ये खराब असेल तर संबंधितांवर कारवाई करणे सोपे होईल, असे त्यांनी सांगितले. कोकण विभागातील सरकारी रुग्णालयांत एकूण २१ लाख एन-९५ मास्क उपलब्ध असून गरज भासली तर ते डॉक्टरांकडून मोफत देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. लवकरच बाजारपेठांमध्ये मुबलक प्रमाणात सॅनिटायझर उपलब्ध होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सॅनिटायझर आणि मास्कच्या विक्रीविषयी काही तक्रारी असतील तर १८००२२२३६५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना या वेळी केले.
0 टिप्पण्या