काळू नदीवरील पूल दुरुस्तीसाठी बंद
शहापूर-किन्हवली-सरळगाव मार्गावर वाहतूक कोंडी
शहापूर
शहापूर तालुक्यातील संगमेश्वरचा काळू नदीवरील पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अखेरच्या घटका मोजत आहे. किन्हवलीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि शहापूर-मुरबाड या दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या या पुलाचे अजूनपर्यंत स्ट्रक्चरल ऑडीटच झालेले नाही. 57 वर्षे आयुर्मान असलेल्या या पुलाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी काय खर्च झाला, याची माहिती निरंक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन वर्षांपासून शहापूर-लेनाड-मुरबाड मार्गावरील काळू नदीवरील पूल दुरुस्तीसाठी बंद असल्याने शहापूर-किन्हवली-सरळगाव या मार्गावरून वाहतूक वाढली आहे.
एका अज्ञात वाहनाने 19 फेब्रुवारीच्या रात्री या पुलाच्या कठड्याला जोरात धडक दिली. त्यामुळे पुलाची हानी झाली असून पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. अहोरात्र अवजड वाहने व इतर पर्यायी वाहतूक या पुलावरून होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या शेणवे-किन्हवली-सरळगाव या रस्त्याचे अन्युईटी हायब्रीड योजनेंतर्गत रस्ता रुंदीकरणाचे काम जोरात सुरू असले तरी काळू नदीवरील संगमेश्वर पुलाची डागडुजी मात्र होताना दिसत नाही. पुलाचे कठडे कमकुवत झाले असून मध्येच पिंपळ, वड यासारखी झाडे रुजली असून त्यांची मुळे घट्ट रोवली आहेत. सध्या पुलावरून वाहतूक करताना प्रवाशांना व वाहन चालकांना धडकी भरते. या पुलाची डागडुजी करून नूतनीकरण करण्याची मागणी करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या