दिल्लीतील वंचितच्या रॅलीत सहभागी होण्याकरिता मा.मायावतींना पत्र
मुंबईः
एनआरसीच्या माध्यमातून केंद्र सरकार बहुजनांचे मूलभूत अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचा प्रशासकीय अनुभव मोठा असल्याने हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करा, अशी साद प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावतींना घातली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ४ मार्च रोजी नवी दिल्लीत नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या ( सीएए) विरोधात रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याची विनंती बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांना खुले पत्र लिहून करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मायावतींना अशाप्रकारचे पत्र लिहिण्याची पहिलीच वेळ असून त्यामुळे राजकीय तर्क लढवले जात आहेत. राष्ट्रीय राजकारणात वंचिताची शक्ती निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आंबेडकरांनी हे पत्र लिहिले असावे, अशी चर्चा सर्वत होत आहे. पत्रामध्ये प्रकाश आंबेडकर पुढे लिहितात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही नेहमीच आघाडीवर राहिल्या आहात. तुमची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द आजही बहुजन जागरण युग म्हणून आठवली जाते, राजधानी नवी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात ४ मार्च रोजी सकाळी १० वाजता देश बचाओ, संविधान बचाओ रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीचे रूपांतर सभेत होणार आहे. याच रॅलीत उपस्थित राहून मार्गदर्शन करण्याची विनंती प्रकाश आंबेडकर यांनी मायावतींना केली आहे.
0 टिप्पण्या