गुडघ्यावर राहून जगण्यापेक्षा उभं राहून मेलेलं बरं - बेलारूसचे अध्यक्ष अॅलेक्झॅण्डर लुकाशिंकोज
करोनाची साथ जगभरामध्ये पसरली आहे. मात्र युरोपमधील बेलारूसमध्ये १५२ जणांना संसर्ग झाल्याचे उघड झाल्यानंतरही देशातील नागरिकांवर कोणत्याही प्रकारची बंधने घालण्यात आलेली नाहीत. बेलारूशीयन प्रिमियर लीगसाठी (फुटबॉल स्पर्धा) प्रेक्षकांनी भरलेली स्टेडियम, हॉटेल, मॉल, सिनेमागहांमध्ये गर्दी असे दृष्य बेलारूसमध्ये दिसत आहे. तसेच शनिवारी झालेल्या आईस हॉकी सामन्यामध्ये लुकाशिंकोज यांनी स्वत: सहभाग घेतला होता. यावेळेस एका पत्रकाराने त्यांच्याशी संवाद साधताना करोनासंदर्भात प्रश्न विचारला असता, “गुडघ्यावर राहून जगण्यापेक्षा उभं राहून मेलेलं बरं. खेळ हे आरोग्यासाठी चांगले आहेत. सध्या या स्टेडीयममधील परिस्थिती फ्रीजसारखी आहे. खास करुन येथील बर्फ हा नैसर्गिक अॅण्टी-व्हायरल औषध आहे,” असं उत्तर त्यांनी दिल्याचं सीएनएनने म्हटलं आहे.
एकीकडे निर्बंध घालण्याचा बेलारूस सरकारचा कोणताच प्रयत्न सुरु असल्याचे चिन्ह दिसत नसतानाच आता तेथील राष्ट्राध्यक्षांनी व्होडकाचे सेवन केल्यास करोना विषाणू मरतो असं अजब वक्तव्य केलं आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार बेलारूसचे अध्यक्ष अॅलेक्झॅण्डर लुकाशिंकोज यांनी करोनावर व्होडकाचा उपाय सुचवला आहे. “लोकांनी व्होडकाने हात धुतले पाहिजेत. इतकच नाही तर त्यांनी व्होडाने करोना विषाणू मारले पाहिजेत. दिवसाला ४०-५० एमएल व्होडका सेवन प्रत्येकाने केलं पाहिजे. फक्त कामाच्या ठिकाणी व्होडका पिऊ नये,” असं लुकाशिंकोज यांनी म्हटलं आहे.
“करोनाबद्दल घाबरुन जाण्यासारखं काही नाही. तुम्हाला आता उलट जास्त काम करण्याची गरज आहे खास करुन ग्रामीण भागांमध्ये. ट्रॅक्टर्स आणि शेतांमुळे सर्वकाही ठिक होईल. शेतं सर्वांना बरं करतील आठवड्यातून दोन ते तीन वेळा गरम वाफ घ्या. त्यानंतर व्होडकाने हात धुण्याबरोबरच १०० मीलीलीटर व्होडका प्या,” असा सल्ला पुढे बोलताना लुकाशिंकोज यांनी दिल्याचे मेल ऑनलाइनने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.
0 टिप्पण्या