कोकण विभागात रोजगार योजनेअंतर्गत विविध कामांवर 8 हजार 908 मजुरांची उपस्थिती- शिवाजी दौंड.
नवी मुंबई :
कोकण विभागातील जिल्हयांतर्गत कृषि, वनपरिक्षेत्र, वनप्रकल्प विभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेशीम विकास अशा विविध विभागांमार्फत कामे सुरु करण्यात आली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागात मनरेगा अंतर्गत 2 हजार 170 कामांना सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी 8 हजार 908 कामगारांनी हजेरी लावली. अशी माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे. कामावर उपस्थित मजूरांची संख्या अशी ठाणे-238 कामे 759 मजूर, रायगड-17 कामे 245 मजूर, पालघर 1165 कामे 5755 मजूर, रत्नागिरी 198 कामे 710 मजूर, सिंधुदूर्ग 552 कामे 1439 मजूर संख्या आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची कालमर्यादा राज्यशासनाने ३० एप्रिल पर्यंत वाढवलेली होती. परंतु ग्रीन झोन सारख्या ठिकाणी जेथे कोरोना बाधीतांची संख्या कमी आहे. अशा क्षेत्रांमध्ये लघुउद्योग, जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मितीचे कारखाने, औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या यांना सोशल डिस्टंसिंगचे नियम तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अटीशर्तींच्या अधिन राहून कामकाज सुरु करण्यास शिथीलता दिली आहे. याच पार्श्वभूमीवर कोकण विभागाअंतर्गत जिल्हयांमधील ग्रामपंचायत, कृषि, वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागांमार्फत विविध ठिकाणी बांधकामाच्या कामांना सुरुवात झाली आहे. यामध्ये रस्तेदुरुस्ती, नवीन रस्त्यांचे बांधकाम, नाले सफाई, नवीन नाल्यांचे बांधकाम, छोटया नद्यांवरील मोऱ्यांची दूरुस्ती व बांधकाम अशा कामांचा समावेश आहे.
मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम) या योजनेअंतर्गत विविध विभागांमार्फत मजूर वर्गाला कामे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ही कामे सुरु झाल्याने मजूर वर्गामध्ये आनंदाची लाट उसळली आहे. लॉकडाऊच्या काळात हातावर कमवणाऱ्या मजूर वर्गाचे मोठयाप्रमाणात नूकसान झाले होते त्यामुळे शासनाच्या या धोरणामुळे या वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
0 टिप्पण्या