राज्यातील कोरोनाबाधित २१७ रुग्ण बरे होऊन घरी
आज राज्यात २२१ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्णसंख्या १९८२
आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई
राज्यात आज कोरोनाच्या २२१ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या १९८२ झाली आहे. २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १६१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४१हजार१०९ नमुन्यांपैकी ३७ हजार ९६४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १९८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत २१७ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ६१ हजार २४७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५०६४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. यातील ७५५ रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी ३७ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, यवतमाळ येथे ७, बुलढाणा जिल्ह्यात ६ , मुंबईत ३ तर प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर मनपा ,हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील ६ जण अहमदनगर येथे तर १ जण पिंपरी चिंचवड येथे करोना बाधित आढळले आहेत.
आज राज्यात २२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे १६, पुणे येथील ३ तर नवी मुंबईचे २ आणि सोलापूरचा १ रुग्ण आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १३ पुरुष तर ९ महिला आहेत. ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत १५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर एकजण ४० वर्षांपेक्षा लहान आहे. मृत्यूमुखी पडलेल्या २२ पैकी २० रुग्णांमध्ये ( ९१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी एकाला मलेरिया देखील होता.
कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १४९ झाली आहे.
0 टिप्पण्या