महापालिकेच्या रुग्णालयात वॉर्ड बॉयची ११४ पदे भरण्याचा निर्णय
मुंबई
मुंबईत करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे करोनाग्रस्तांची सेवा तसेच या बाबतची इतर कामे करण्यासाठी पालिकेने कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारितील विशेष रुग्णालयातील रिक्त असलेली वॉर्ड बॉय ही पदे भरण्यासाठी ९ एप्रिल २०२० रोजी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदासाठी १८ हजार ते ५७ हजार इतका पगार निर्धारित करण्यात आला असून, शैक्षणिक पात्रता दहावी पास असावी. महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स यांच्यावर करोनामुळे कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने कक्ष परिचर अर्थात वॉर्ड बॉयची ११४ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून १७ एप्रिल २०२०पूर्वी अर्ज पोस्टाने किंवा ईमेल आयडीवर पाठवण्याचे तसेच पालिका मुख्यालयातील बॉक्समध्ये टाकण्याचे आवाहन केले आहे.
इच्छुक उमेदवारांनी महापालिकेच्या http://portal.mcgm.gov.in या वेबसाइटवरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा आणि जाहिरातीतील अटी व शर्ती तसेच सूचनांनुसार भरावा आणि आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती पीडीएफमध्ये तयार करून अर्जासह mcgm.wardboy@mcgm.gov.in या ईमेल आयडीवर तसेच, ज्यांना शक्य नसेल त्यांनी पोस्टाने किंवा महापालिका मुख्यालयातील गेट क्रमांक ७ या ठिकाणी ठेवलेल्या बॉक्समध्ये १७ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाठवावा, असे आवाहन महापालिका सामान्य प्रशासन विभागाने केले आहे.
0 टिप्पण्या