३ मे नंतर सतर्कतेच्या दृष्टीने प्रभावी धोरण आखण्याची आवश्यकता- प्रधानमंत्री नरेद्र मोदी
नवी दिल्ली
लॉकडाऊनचा कालावधी वाढवायचा की नाही यावर सोमवारी निर्णय झालेला नाही. मात्र, ३ मे नंतर सूट द्यावी अशी स्थिती देशात नाही. लॉकडाऊन स्थानिक पातळ्यांवर सुरू ठेवण्याचा विचार होऊ शकतो असे दिसत आहे. परिस्थिती सामान्य होण्याच्या दृष्टीने हॉटस्पॉट, रेड झोन आणि ग्रीन झोनवर विशेष लक्ष केंद्रीत करून त्या दिशेने काम करण्याची आवश्यकता असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. ३ मेनंतरही रेड झोनमध्ये लॉकडाऊन सुरू राहण्याची शक्यता आहे. यलो झोनमध्ये काही सूट मिळू शकते, तर ग्रीन झोनमधील बंदी हटवली जाऊ शकते. ग्रीन झोनमध्येही सोशल डिस्टन्सिंग मात्र सुरूच राहील. देशव्यापी लॉकडाऊनबाबत ३ मे नंतर निर्णय घेण्यात येणार असून यात लॉकडाऊन हटविण्याबाबत एक धोरण निश्चित करावे लागेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेदरम्यान म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.
ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, अशा १० राज्यांनी लॉकडाऊनच्या बाजूने आपले मत नोंदवले आहे. या राज्यांमध्ये दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांचा समावेश आहे. तेलंगणा या राज्याने तर या पूर्वीच राज्यातील लॉकडाऊन ७ मे पर्यंत वाढवले आहे. हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये मात्र लॉकडाऊन कायम ठेवण्याचा पंतप्रधानांचा विचार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. लॉकडाऊन लागू केल्यामुळे त्याचा परिणाम देशभरात दिसल्याचे सांगत कोरोना संकटाचा परिणाम जेवढा बाहेरील देशांवर झाला तेवढा भारतावर झाला नसल्याचे पंतप्रधानांनी या चर्चेत सांगितले. मात्र, असे असले तरी ३ मे नंतर सतर्कतेच्या दृष्टीने प्रभावी धोरण आखण्याची आवश्यकता असल्याचे मोदी म्हणाले. या धोरणामुळे लोकांच्या रोजचे जगणे सोपे व्हावे आणि साथीच्या आजाराला नियंत्रणात ठेवणेही शक्य व्हावे असे हे धोरण असेल, कोरोनाविरोधातील ही एक दीर्घकालीन लढाई असून आपल्याला मोठ्या धैर्याने याचा सामना कराला लागेल, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.
0 टिप्पण्या