Top Post Ad

दिवे लावा! विवेक विझवा!!  

दिवे लावा! विवेक विझवा!!!


          प्रेमरत्न चौकेकर 
                   
दिनांक  : 5 एप्रिल 2020 
वेळ  :  रात्री 9 वाजता  
कालावधी : 9 मिनिटे  
कार्यक्रम : लाईटस् ऑफ आणि  मेणबत्ती मोबाईल फ्लॅशलाईट ऑन 
प्रमुख पात्र  : प्रधान सेवक  
प्रसंग : करोनाशी युद्ध  
स्थळ : घराघरात  
 




        मित्रांनो.... 
        खूप प्रयत्न केला. पण गप्प बसवेना.       तडफड! फडफड ! 
     करोना Virus ने जगभर हाहाकार माजवलाय.  हे आपण जाणताच. चीनमध्ये सुरू झालेला हा करोना नामक उच्छाद आज जगाच्या कानाकोप-यात पसरला आहे. दिवसागणिक पेशंटची संख्या वाढत आहे.  मृतांची संख्याही वाढत आहे. इटली, अमेरिका सारख्या प्रगत देशात सुध्दा मृतांची संख्या आश्चर्यकारकरित्या वाढत आहे.  
         परंतु जग अचानक आलेल्या या जैविक संकटातून हळूहळू सावरत आहे. सर्वच देशातील संशोधक या रोगावर औषध शोधून काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. डाॅक्टर, नर्सेस, सहाय्यक स्टाफ पेशंटच्या मागे दिवसरात्र धावपळ करीत आहेत.  पोलिसांची फौज लोक रस्त्यावर येऊ नयेत म्हणून कृतीशील आहे.  
         प्रधान सेवकाला मात्र अजून परिस्थितीचं गांभीर्य कळलं नाही असं म्हणायला खूप जागा आहे. आधी त्यांनी लोकांना टाळ्या, थाळ्या वाजवायला सांगितलं. कालच्या नवीन व्हिडिओ मध्ये त्यांनी लोकांना दिवे पेटवायला सांगितले आहे.  
         प्रधान सेवक म्हणाले, रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटं आपापल्या घरातील लाईट पूर्णपणे बंद करून मेणबत्त्या आणि मोबाईलचा फ्लॅश लाईट ऑन करायचा.  
        खरंच! किती भयंकर! 
         आहे तो लाईट बंद करायचा आणि  मेणबत्त्या पेटवायच्या! मोबाईलचे फ्लॅशलाईट ऑन करायचे! म्हणजे जग पुढे चाललंय त्याला मागे रेटायचं. किती मागास कार्यक्रम. किती बुरसट विचार.  
         ज्या देशाला असे बुरसट, सनातन विचाराचे राज्यकर्ते लाभतात त्या देशाचं दिवाळं काढायला शत्रूची काय गरज आहे? आर एस एस यांची शाळा. विषमतेचं व्याकरण हे याचं तत्वज्ञान. वर्णजातीची उतरंड हा यांचा आदर्श. 
          अख्ख्या जगाने विज्ञानाची कास पकडलीय. विवेकवाद आजचा जगण्याचा मार्ग होतोय. तंत्रज्ञान नवनवीन शिखरे गाठत आहे. आणि  आम्ही मंगलयानाचे वैज्ञानिक प्रक्षेपण करनाना सुध्दा नारळ फोडतोय!  राज्यकर्त्यांनो आतातरी शहाणे व्हा! विज्ञाननिष्ठ व्हा! विवेकवादी व्हा! तरच देशाचं कल्याण होईल.  इथली माणसं सुखी होतील! आपापल्या वर्णजातवर्ग हितसाथू आणि आत्यंतिक स्वार्थी राजकारण आतातरी सोडा. 
         करोना मुळे वाढत चाललेल्या पेशंटच्या संख्येचा ताणतणाव जगभरच्या राज्यकर्त्यांना आला आहे. मृतांच्या वाढत्या संख्येमुळे सगळ्या राज्यकर्त्यांच्या झोपा उडाल्या आहेत  आणि इकडे आमच्या प्रधान सेवकाने भातुकलीचा खेळ मांडला आहे. म्हणे दिवे लावा. लाईट घालवा आणि दिवे लावा! 
         आज लाॅकडाऊन मुळे हातावर पोट असणा-या लाखो लोकांच्या पोटापाण्याच्या  प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. हे लाखो लोक शहर सोडून आपापल्या गावी जायला निघाले आहेत. शेकडो किलोमीटर अंतर बायकापोरांसह पायीच चालणार आहेत. त्यांचे जीवन उध्वस्त झाले आहे. आधीच दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे कंगाल झालेला शेतकरी या  नवीन संकटामुळे देशोधडीला लागला आहे. आत्महत्येशिवाय त्याला पर्याय राहिलेला नाही.  घाऊक आणि किरकोळ बाजार थंड पडले आहेत. ट्रान्सपोर्ट बंद आहे. व्यापार बंद आहे. उद्योग बंद आहेत. जनजीवन जणू थांबलं आहे. 
         या पार्श्वभूमीवर प्रधान सेवक खूप गाजावाजा करून टिव्ही वर आला. लोक श्वास रोखून आणि  कानात प्राण आणून प्रधान सेवकाचा राष्ट्राला संदेश ऐकण्यासाठी टिव्ही समोर बसले होते. पण कसलं काय? सगळं एकदम फुस्स्स....  
         प्रधान सेवकाने लोकांना दिवे लावायला सांगितले. खरं तर भारतीय परंपरेमध्ये काही आनंदाची घटना घडली तर दिवे लावायची, दिवे ओवाळायची पध्दत आहे. पण इथे एकिकडे गंभीर प्रसंग ओढवलाय, देशावर शोककळा पसरली आहे. लोक भीतीने ग्रस्त आहेत. पुढे काय या विचाराने त्रस्त आहेत. आणी दुसरीकडे प्रधान सेवक दिवे लावायचा देशाला संदेश देत आहेत. हि कुठली मानसिकता आहे? हे कोणते संस्कार आहेत? 
         बरं या दिवे लावण्याची तांत्रिक बाजूसुध्दा या अतिउत्साही प्रधान सेवक व त्याच्या चेले चपाट्यांनी अभ्यासलेली नाही.  महाराष्ट्राच्या ऊर्जा मंत्र्यांनी नुकताच धोक्याचा  इशारा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार एकाच वेळी अचानक जर अशाप्रकारे देशभर लाईट बंद केला तर ईलेक्ट्रीक ग्रीड मध्ये मोठा बिघाड होऊ शकतो. परिणामी देश दीर्घकाळ अंधारात जाऊ शकतो. असं असताना प्रधान सेवकाला कसली अवदसा सुचलीय काय ठाउक? दीर्घकाळ पर्यटन न केल्याचा तर हा परिणाम नसावा? 
         या गोष्टीचा छडा लावण्यासाठी आम्ही जरा खोलात शिरलो. आणि काही गोष्टी आमच्या हाती लागल्या. आम्ही भिंतीवर  टांगलेली दिनदर्शिका पाहिली. मुद्दामच बामणी पंचांग पाहिले. कारण इथले सगळे ग्रेट इव्हेंट बामणी पंचांगानुसार होतात हे आतापर्यंत सर्वानाच माहित झालं आहे.  आश्चर्य म्हणजे आमचा अंदाज खरा ठरला!  रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी वामन जयंती आहे. होय! तोच वामन ज्याला तीन पाय होते म्हणे!  एक पृथ्वीवर,  दुसरा आकाशात म्हणजे स्वर्गात आणि तिसरा कुठे ठेवावा असा त्या चर्मचक्षुचमत्कारीक  त्रिपाद बुटक्या  वामनाला प्रश्न पडला होता. तो प्रश्न महाप्रतापी पण भोळसट बळी राजाने सोडविला.  अत्यंत नम्रपणे तो वामनास म्हणाला, 'आपला तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेवा.' धूर्त वामनाने क्षणाचाही विलंब न करता बळीच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पाताळात गाडून टाकले असं ब्राह्मणी ईतिहास सांगतो. आज बहुजन ईतिहासकारांनी हे सिध्द केलंय की बळीराजाचा बळी घेतला त्याक्षणी  इथल्या समृद्ध नागद्रवीड संस्कृतीचा व साम्राज्याचा  ताबा आर्यब्राम्हणांनी आपल्या हाती घेतला. तो आर्यब्राम्हण संस्कृतीचा विजय दिन आणि भारतीय नागद्रवीड संस्कृतीचा पराभवाचा दिवस! आजही महाराष्ट्रात 'ईडा पिडा ठळो अन् बळीचे राज्य येवो!' असं म्हटलं जातं. हजारो वर्षांनंतरही आम्ही महाप्रतापी बळीराजाला विसरलेलो नाही.  बळीराजाला फसवून त्याचा खून करणारा  आर्यभटांचा म्होरक्या वामन आणि त्याची संस्कृती विरूध्द नागद्रवीड बळीराजा व त्याची समृद्ध नीतीमान  संस्कृती असा हा थेट ऐतिहासिक संघर्ष आहे. हजारो वर्षांच्या ब्राह्मणीकरणाच्या प्रक्रियेतसुध्दा आजही हा संघर्ष सुप्तपणे जीवंत आहे! वामन जयंतीचा दिवस आर एस एस प्रणित भाजप निवडणे साहजिकच म्हणायचे!  तुमच्या पराभवाचे उत्सव तुमच्याकडूनच साजरे करून घ्यायचे ही ब्राह्मणी रणनीतीची खासियत आहे !
         दुसरा प्रश्न 9 वाजता 9 मिनिटेच ही दिवाळी कशासाठी? त्याचंही उत्तर मिळालं.  प्रमोद महाजन हे एके काळचं  भाजप मधलं मोठं प्रस्थ. खाजगीकरणाचा मोठा प्रणेता. त्यांच्या मते 9 हा आकडा भाजप साठी लकी आहे. म्हणून 9 वाजता 9 मिनिटे . कळलं? खरं तर 9 तारीख पकडायची होती. पण वामन जयंती सारखा दुसरा ऐतिहासिक मुहूर्त कुठला सापडणार? 
         प्लेग, काॅलरा, सार्स,  करोना अशा साथी येत असतात. निघूनही जातात. असंख्य माणसांचे बळी घेऊन जातात. पुन्हा जगरहाटी सुरू रहाते. सरकारे येतात. सरकारे जातात. मूलभूत प्रश्न तसेच रहातात. 130 कोटी लोकसंख्या असलेला हा देश.  जवळजवळ 40% लोक इथे रोज उपाशी झोपतात.  30% लोकांना घरंच नाहीत. जवळजवळ 60% लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही. 40% मुले अजून शाळेच्या बाहेर आहेत. आरोग्याची ऐसी तैसी आहे. हजारो बालके दरवर्षी भूकबळी जातात. या इथल्या मूलभूत समस्या आहेत. या समस्यांवर प्रधान सेवक काही बोलेल, काही करील अशी सामान्य लोकांची अपेक्षा होती. 
         परंतु प्रधान सेवक मूठभर  प्रस्थापितांचा निष्ठावंत सेवक! नवनवीन विमानतळ, मेट्रो, लूप ट्रेन, माॅल, कार्पोरेट बिझनेस हब्ज, कार्पोरेट हाॅस्पिटल्स ही त्यांची प्राथमिकता! त्यामध्ये तुम्ही म्हणजे केवळ चीप लेबर.  स्वस्त मजूर! 
तुम्ही करोनामुळे मेलात काय किंवा टि. बी. ने मेलात काय.. काय फरक पडतो? .
         तुम्ही टाळ्या वाजवा! थाळ्या वाजवा! 
         आणि हो! 
         न विसरता दिवे लावा... 
         तारीख लक्षात आहे ना?  रविवार 5 एप्रिल 2020!  
         रात्री 9 वाजता 9मिनिटे! वामन जयंती!!  मुबारक हो!!!  


         आमच्या घरचे लाईटस् मात्र नेहमीप्रमाणे चालू रहातील!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com