ठाण्यात क्वारंटाईन रूग्णांचे होतात हाल
# १२ दिवसांपासून रूग्ण रिपोर्टच्या प्रतिक्षेत
केंद्रेंवर कारवाई करा - मिलींद पाटील
ठाणे
कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यानंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाण्यात संशयित रूग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर उभे करण्यात आले आहेत. डाॅ. केंद्रे यांची विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे क्वारंटाईन केलेल्या रूग्णांचे खाण्यापिण्याचेही हाल होत आहेत. या संदर्भात डाॅ केंद्रे यांच्याशी संपर्क साधूनही उपाययोजना केल्या जात नसल्याची माहिती मा.विरोधी पक्ष नेते मिलींद पाटील यांनी दिली.
ठाणे शहरातील सिव्हील रूग्णालय आणि पातलीपाडा येथे ठामपाच्या अखत्यारीत संशयित कोरोना रूग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर उभे करण्यात आले आहे. या सेंटर मध्ये अनेक संशयित रूग्णांना ठेवण्यात आले आहे. कळवा परिसरातील चार जण या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले आहेत.स्वॅबचा नमुना १२ दिवसांपूर्वी नेण्यात आला असून त्याला नंतर सिव्हील रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. मात्र, अद्याप त्याचा अहवाल देण्यात आलेला नाही. तर या ठिकाणी एका दीड वर्षाच्या मुलीलाही क्वारंटाईन करण्यात आले असून तिच्या दुधाचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. येथील स्थानिक नगरसेवकाकडून या मुलीला दुधाचा पुरवठा करण्यात येत आहे. तर या क्वारंटाईन रुग्णांना नाश्तादेखील दुपारी १२ वाजता देण्यात येत आहे. दुसरीकडे पातलीपाडा येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये कळव्यातील दोन मुली आहेत.या ठिकाणीही अहवाल येत नसल्याने त्यांना नाहक अडकून पडावे लागले आहे. या ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे सर्वत्र अंधार दाटत असल्याने अघटित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मुलींच्याही जेवणाखाण्याची मोठी अबाळ होत आहे. सदर रूग्णांनी ही माहिती आपणाला दिल्यानंतर आपण डाॅ. केंद्रे यांना त्याची माहिती दिली. मात्र, त्यांनी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे केंद्रे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच क्वारंटाईन करण्यात आलेल्या रूग्णांना सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी मा. विरोधी पक्ष नेते मिलींद पाटील यांनी केली आहे.
0 टिप्पण्या