आर्थीक दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत उपचार सुविधा उपलब्ध करुन द्यावी- महापौर
ठाणे
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, कल्याण -डोंबिवली, मीरा-भाईंदर महानगरपालिकेने कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी सुसज्ज रुग्णालये तयार करुन यामध्ये आर्थिक दुर्बल घटकातील कोरोनाबाधीत रुग्णांवर मोफत उपचार महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे, याचधर्तीवर ठाणे महापालिकेने देखील आपल्या रुगणालयांमध्ये आर्थीक दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत उपचार सुविधा उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी ठामपा आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच महापालिका कार्यक्षेत्रातील दारिद्रय रेषेखालील नागरिकांची कोविड 19 च्या उपचाराची जबाबदारी महापालिकेने घ्यावी आणि ऑटोमेटिक टेस्टींग मशीन बसविण्यात यावी. असेही पत्रात नमूद केले आहे.
कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य उपचार करता यावेत यासाठी महापालिकेने काही रुग्णालय कोविड उपचार रुग्णालय म्हणून घोषित केलेली आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून असे दिसून येते की, ज्या रुग्णांना कोरोनाचे संक्रमण होत आहे, त्यामध्ये आर्थिक दुर्बल घटकातील रुग्ण देखील आढळून आले आहेत. अशा दारिद्रय रेषेखालील रुग्णांना उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, व त्यामुळेच संशयित व्यक्ती उपचार घेण्यासाठी पुढे येत नसल्याने याचा परिणाम अनेक नागरिकांना संसर्ग होत आहे ही अतिशय गंभीर बाब आहे.महापालिकेच्या माध्यमातून कोरोना उपचार रुग्णालय म्हणून जाहीर केलेल्या रुग्णालयात आर्थिक दुर्बल घटकातील कोरोनाबाधित रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध केल्यास सदरहू रुग्ण या ठिकाणी उपचार घेवू शकतील व काही प्रमाणात याचा प्रादुर्भाव रोखला जाईल.असे महापौरांनी पत्रात नमूद केले आहे.
कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून महापालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या प्रयोगशाळेवर याचा ताण येत आहे, काही नागरिकांना विशेषत: आर्थीक दुर्बल घटकातील नागरिकांना खाजगी लॅबमध्ये तपासणी करण्यासाठी जावे लागते ही बाब त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. परिणामी काही नागरिक तपासणी करुन घेण्यास तयार नसतात. संशयित रुग्णांची तातडीने तपासणी करुन योग्य निदान होणेसाठी ऑटॉमेटिक मशीन देखील उपलब्ध झाल्याचे समजते. ऑटोमेटिक मशीनच्या माध्यमातून एका तासात 12 ते 24 चाचण्या व दिवसभरात 120 ते 240 चाचण्या होऊ शकतील अशा क्षमतेच्या मशीन्स उपलब्ध झालेल्या आहे. सद्य परिस्थितीत संशयित रुग्णांची तपासणी व महापालिकेच्या रुग्णालयाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या डॉक्टर्स, नर्सेस यांची देखील तपासणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या मशीन्सची चौकशी करुन त्या महापालिकेच्या लॅबमध्ये तातडीने उपलब्ध करणे गरजेचे आहे.. तरी वरील सर्व बाबींचा विचार करुन महापालिकेच्या माध्यमातून संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यासाठी ऑटोमॅटिक मशीन बसविणे व दारिद्रय रेषेखालील कोरोनाबाधीत रुग्णांची तपासणी व उपचार महापालिकेच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करुन देण्यातबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने व्हावी. असे शेवटी महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या