एबीपी माझाच्या वार्ताहर राहुल कुलकर्णी यांच्या वार्तांकनावर बांद्रा कोर्टाचे कडक ताशेरे
मुंबई
१.आरोपीने दिलेली बातमी ही दिशाभूल करणारी आहे. २.ह्या महामारीच्या काळात व ब्रेकिंग न्यूजच्या नादात आरोपीचे बेजबाबदार वर्तन. ३.अजून अशा पद्धतीचे इतर घटना टाळण्यासाठी पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच. ४.तपास अधिकारी यांनी पोलीस कोठडीची केलेली मागणी कोर्ट फेटाळत आहे, ३० एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी कोर्ट देत आहे. ५.करोनाची महामारी लक्षात घेता न्यायालय आरोपीस ₹२०,०००च्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन देत आहे. ६.माध्यमांना बोलण्याचे व वार्तांकनाचे स्वातंत्र्य आहे मात्र त्याचा गैरवापर करून माध्यमांनी चिथावणीखोर वार्तांकन करू नये. ७.आरोपीकडून अशी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्यास अटक करणे योग्य होते तसेच कारवाईचे रेकॉर्ड तपासले असता असे आढळून आले आहे की आरोपीने पोलिसांना अटके दरम्यान सहकार्य केलेले नाही; दरम्यान आरोपीच्या वकीलास व नातेवाईकांस अटकेची पूर्वकल्पना दिली होती.
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी नेण्यासाठी जनसाधारण स्पेशल ट्रेन्स सोडण्यात येणार असल्याचं वृत्त एबीपी माझानं काल सकाळी दाखवलं होतं. दक्षिण मध्य रेल्वेनं काढलेल्या पत्राच्या आधारे वृत्त दिल्याचं राहुल कुलकर्णीनी वार्तांकन करताना म्हटलं होतं. याच वृत्तामुळे काल दुपारच्या सुमारास वांद्र्यात गर्दी झाल्याचा दावा सोशल मीडियावर अनेकांनी केला. चुकीचं वृत्त दाखवण्यात आल्यानं मजुरांनी गर्दी केली, असा दावादेखील करण्यात आला.
कोरोनाचा वाढता धोका, लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ ओढावलेले हजारो मजूर विविध अफवांमुळे १४ एप्रिल रोजी दुपारी वांद्रे स्थानक परिसरात जमल्यानं तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांना तेथे अतिरिक्त कुमक मागवावी लागली. काही मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दोन तासांनी ही गर्दी नियंत्रणात आली. या प्रकरणी सुमारे ८०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. यानंतर रेल्वेनेही ३ मेपर्यंत प्रवासी वाहतूक बंद करण्याचं जाहीर केले. त्यामुळे १५ एप्रिल ते ३ मे दरम्यान देशभरात ज्या लोकांनी रेल्वेचे तिकिट बुक केले आहेत, त्यांचे बुकिंग आता रद्द केले जाणार आहे. विशेष म्हणजे रेल्वेने परिपत्रक काढून आणि ट्विट करुन कुठलिही विशेष रेल्वे चालविण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे, रेल्वेकडून अडकलेल्या मजूरांसाठी विशेष ट्रेन चालविण्यात येणार हे वृत्त निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
0 टिप्पण्या