परीस्थिती पूर्व पदावर येईपर्यंत मदत कार्य सूरुच ठेवण्याचा निर्धार, दानी लोकांच्या सहकार्याची अपेक्षा - भीमराव चिलगावकर
मुंबई
बहुजन संग्राम या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून १४ एप्रिल पासून सुरू झालेल्या या उपक्रमाअंतर्गत गेल्या ४ आठवड्यात शिधा-किराणा वाटपाचे ४ टप्पे पार पडले असून आतापर्यंत ३८०० गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे पुढील काळातही नाका कामगार, बांधकाम मजूर, मोलकरणी, निराधार महिला, परीत्यक्ता या घटकांना समाजातून पाठबळ मिळण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे सारी भिस्त सरकारवर न टाकता स्वयंसेवी संघटना व सुस्थितीत असलेल्या नागरिकांनी मदतीचा ओघ बंद पडू न देण्याची गरज आहे. धोका अजून टळलेला नाही. लॉकडाऊनही सुरूच आहे. जनजीवन अद्यापही सुरळीत झालेले नाही. म्हणून मदतीची अजूनही अपेक्षा आहे तरी याकामी सहकार्य करण्याचे आवाहन भीमराव चिलगावकर यांनी केले आहे.
जूनमध्ये सुरू होणार्या पावसाळ्यात तर हातावर पोट असलेल्या वर्गाची रोजगाराअभावी अधिकच दैना होण्याचा धोका समोर उभा आहे. त्यामुळे बहुजन संग्राम या आमच्या महाराष्ट्रव्यापक संघटनेने हाती घेतलेले मदत कार्य परीस्थिती पूर्व पदावर येईपर्यंत म्हणजेच पावसाळा संपेपर्यंत सूरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे. बहुजन संग्राम या सामाजिक आणि विधायक संघटनेने कोरोनाच्या या संकट काळात हातावर पोट असलेल्या ५ हजार श्रमिक बांधवांसाठी शिधा वाटप करण्याचे उद्धीष्ठ डोळ्यासमोर ठेवले असून प्रत्येकी ५ किलो तांदूळ, ५ किलो गहू, १ किलो गोडेतेल, १ किलो साखर असे १२ किलो जीवनावश्यक वस्तू वाटपाचा उपक्रम हाती घेतलेला आहे.
त्यानुसार मदत कार्याचा चौथा टप्पा हा दिनांक १२ जून शुक्रवार रोजी पालघर या आदिवासी बहूल जिल्ह्य़ातील वाडा, जव्हार, मोखाडा, तलासरी या अति दुर्गम भागातील उपासमार होत असलेल्या सुमारे बाराशे आदिवासींना प्रत्येकी १२ किलो शिधा - किराणा वाटप करण्यात येणार आहे. कोरोनाच्या जागतिक संकटाच्या फेर्यात सापडलेल्या जनसामान्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून सढळ हाताने व उदार अंतःकरणाने आधार देण्याच्या या सेवाभावी व विधायक उपक्रमाला दात्यांनी सहानुभूती पूर्वक हातभार लावून गोरगरीब समाजाला उपासमारीपासुन वाचवून त्यांचा आपण दूवा घ्यावा असे कळकळीचे नम्र आवाहन बहुजन संग्रामचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगांवकर यांनी केले आहे
0 टिप्पण्या