लॉकडाऊन असतानाही महाराष्ट्रात एप्रिलमध्ये सर्वाधिक ५९१ कंपन्यांची नाेंदणी
नवी दिल्ली
देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मार्च महिन्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. एप्रिलमध्ये देशभरात लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु झाली. या काळात लाेकांना घराच्या बाहेर पडण्यास पूर्णत: मज्जाव करण्यात आला. मात्र याच काळात देशात ३,२०९ नवीन कंपन्या स्थापन झाल्याची माहीती मिळत आहे. कंपनी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये सर्वाधिक ५९१ कंपन्यांची (१८.४२ %) नाेंदणी महाराष्ट्रात झाली आहे. तेच दिल्लीत ३६८ (११.४७ %) व कर्नाटकात ३५० (१०.९१ %) कंपन्यांची स्थापना झाली आहे. गेल्या ४-५ वर्षांपासून कंपनी नाेंदणीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल झाली असून लाेक घरी बसल्या बसल्या नाेंदणी करू शकतात. त्याचमुळे एप्रिलमध्ये कडक लाॅकडाऊन असतानाही माेठ्या संख्येने कंपन्यांची नाेंदणी झाल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.
या कंपन्यांचे अधिकृत भागभांडवल १,४२९.७५ काेटी रुपये आहे. परंतु ही संख्या मार्च आणि मागील वर्षातील एप्रिलमध्ये स्थापन झालेल्या कंपन्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. या अगाेदरच्या एका महिन्यात म्हणजे मार्च २०२० मध्ये ५,७८८ नवीन कंपन्या स्थापन झाल्या, तर एप्रिल २०१९ मध्ये १०,३८३ नवीन कंपन्या स्थापन झाल्या हाेत्या. कंपनी प्रकरणांचे तज्ञ व एचकेसी अँड कंपनीचे पार्टनर सीए कीर्ती जाेशी यांच्या मते, जर एखाद्याकडे सर्व दस्तएेवज तयार असतील तर कंपनीची नाेंदणी एका दिवसात हाेऊ शकते. परंतु नवीन व्यक्तीला यासाठी थाेडा जास्त वेळ लागू शकताे. कारण त्यांचा ‘संचालक आेळख क्रमांक’ व डिजिटल स्वाक्षरी स्वतंत्रपणे तयार करावी लागते. ही प्रक्रियाही घरबसल्या आॅनलाइन हाेऊ शकते.
0 टिप्पण्या