कंपनीच्या अमानुष कारभारामुळे अखेर कोरोनाबाधित कामगाराचा मृत्यू
ठाणे
अत्यावश्यक सेवेच्या कोणत्याही निकषात मोडत नसताना, निव्वळ स्वतच्या हव्यासापोटी सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवत, 15 एप्रिल-2020 पासूनच उत्पादनाला सुरुवात करण्राया आणि कामगारांवर कामावर येण्यास दबाव टाकणाऱया नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसीमधील 'सुल्झर पंप्स्' कंपनीतील कोरोनाबाधित रुग्णाचा, अखेर शुक्रवार (26 जुन) रोजी सकाळी ठाण्याच्या कौशल्य हॉस्पिटलमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.
सोशल डिस्टन्सिंगचा दिखाऊपणा करून कामगारांच्या जीवाशी खेळणाऱया, 'सुल्झर' व्यवस्थापनाच्या या अमानुष काराभाराविरोधात, कामगारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, कंपनीतील कामगार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. व्यवस्थापनाविरोधात कामगारांनी, रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे, नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांच्याकडे सामूहिकरीत्या स्वाक्षऱया करून तक्रार अर्ज सादर केला असून, याद्वारे संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
नोकरी जाण्याच्या भीतीने लॉकडाऊनच्या काळातही, कामगारांनी स्वतच्या जीवाची बाजी लावत कामावर उपस्थिती दर्शवली, परंतु सोशल डिस्टन्सिंगचा निव्वळ दिखाऊपणा करणाऱया 'सुल्झर' व्यवस्थापनाने कामगाराच्या आरोग्याची काळजी घेतली नाही. परिणामी, कोरोनाबाधितांची संख्या दोनवरून चार होताच, कंपनी व्यवस्थापनाने नाईलाजास्तव नवी मुंबईतील एक खासगी रुग्णालयाला हाताशी धरून कामगारांची 'तथाकथित' चाचणी करण्याचे सोपस्कार पार पाडले,
मात्र त्याचा कोणताही सकारात्मक परिणाम न होता, उलट कोरोनाग्रस्त कामगारांची संख्या थेट पंचवीसहून अधिक झाली. 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल असोसिएशन'च्या निर्देशानुसार, बाधित कामगार-कर्मचाऱयांची माहिती घेऊन त्यांना नियमाप्रमाणे 14 दिवस विलगीकरण करणे महत्त्वाचे होते, परंतु याकडे देखील कंपनी व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले. यासंदर्भात प्रसिद्धीमाध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित होताच, नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱयांनी कंपनीत पाहणी दौरा केला. मात्र त्यांनी एकाही कामगाराशी याबाबत चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली नाही. उलटपक्षी, व्यवस्थापनाकडून महानगरपालिकेने 500 पीपीई किट आणि फेसशिल्ड मदतीच्या नावाखाली पदरात पाडून घेतले.
कंपनी व्यवस्थापन आणि शासकीय व्यवस्था यांच्या हलगर्जीपणामुळेच अखेर एका निरपराध कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, यासंदर्भात व्यवस्थापनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी कामगारांच्या वतीने रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे, नवी मुंबई पोलीस आयुक्त व उपायुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. कामगार संघटनेने आक्रमक पवित्रा घेऊन न्यायालयीन लढा उभारण्याचा निर्वाणीचा इशारा दिला असून, व्यवस्थापनाच्या मनमानीपणामुळेच, एका निरपराध कामगाराला आपला जीव गमवावा लागला असल्याची संतप्त प्रतिक्रिया युनियनने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
0 टिप्पण्या