नागपूजेतील संस्कृती: शोध आणि बोध
'नागपंचमी' हा सण सावण शुद्ध पंचमीला दरवर्षी भक्तीभावाने साजरा केला जातो. सर्पपूजेच्या प्रतिकात्मक रुपात पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणून ती भारतात विद्यमान आहे. गाव खेड्यात या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. शेतीची कामे बंद असतात. पण त्यांना ही सुट्टी कोणाच्या स्मृतीत पाळत आहोत? या प्रश्नाचे उत्तर सर्प असे मिळते, ही खरी शोकांतिका आहे.' हे माहितीचे मागासलेपण घालविण्याचा प्रयत्न न झाल्यास नुसतीच सर्पाची भिती, शेतकऱ्यांचा मित्र वगैरे उद्देशातून नागाची जुजबी पूजा सुरू राहील अशा परंपरेतून यथास्थितीवादच अधिक बळावत जाईल. कारण नागपंचमीचा संबंध नाग या सर्पाशी नसून नाग हे टोटेम ( प्रतीक) असणाऱ्या पाच पराक्रमी नाग-राजांशी आहे
१.अनंत (शेष) २.वासुकी ३.तक्षक ४.कर्कोटक ५.ऐरावत (पिंगाला) ही पाच त्या नाग-राजांची नावे आहेत. त्यांची स्वतंत्र्य राज्ये होती; जी गणतांत्रिक (Republican) स्वरूपाची होती. त्या पाच राज्यांमध्ये 'अनंत' हा सर्वात जेष्ठ मानला जातो. जम्मू-काश्मिरमधील 'अनंतनाग' हे शहर त्या नागराजांच्या स्मृतिची साक्ष पटवून देते. त्यानंतर दुसरा नागराजा 'वासुकी' कैलास मानसरोवर क्षेत्राचा प्रमुख होता. तिसरा नागराजाःतक्षक, ज्याचे स्मृतीत आज पाकिस्तानातील तक्षशिला (तक्षीला) आहे. चौथा राजा कर्कोटक, तर पाचवा ऐरावत (रावी नदीच्या शेजारी). अशा पाच नागराज्यांची गणराज्ये एकमेकांच्या राज्याला लागून होती. त्या पाच राजांच्या फने असलेल्या नागावर (भुजंग=मोठा नाग) पृथ्वी टिकुन असणे म्हणजे, या प्रमुख पाच कुळीय नागराजांच्या राज्याने भारत व्यापलेला असणे असा प्रतिकात्मक अर्थ आहे.
प्रत्यक्षात भुजंग म्हणजे नागयोध्ये किंवा नागवंशी योद्धे; जे शत्रूच्या छावणीत गेल्यानंतर शत्रूला एकतर परास्त करतील किंवा लढतांना शहीद होतील. म्हणून ही पाच नावे प्रत्यक्षात नागकुळाच्या प्रमुखाची आहेत. हेच योद्धे नंतरच्या पिढयांना मार्गदर्शक म्हणून पूजनीय वंदनीय ठरलेत. त्यांनाच कुल /कुळदेवता असे संबोधले जाऊ लागले. ज्यांच्यापासून मग त्या त्या कुळाचा विस्तार झाला; त्यांच्याशी नंतरच्या पीढीने आपले नाते सांगणे सुरू केले. कारण ते त्यांचे अनुज (वंशज) होते. तक्षक नागराज्याच्या नावाने तक्षशीला हे विद्यापीठ जगप्रसिद्ध होते. त्या पाच राजांच्या स्मृतीला उजाळा देण्यास्तव जो उत्सव दरवर्षी आयोजित केला तो 'नागपंचमी' म्हणून ओळखला जाऊ लागला देशभरात हा उत्सव साजरा होऊ लागला. परंतु यज्ञवंशीयांच्या लेखणीने नागपूजेमागचा संदर्भच गडप करून टाकला आणि आमच्या माथी नुसतीच नागपूजा मारली.
नागवंशी राजांनी त्यांच्या राज्यात जे चलन उपयोगात आणले त्यावर आणि त्यांच्या ध्वजावर नाग हे प्रतीक होते.त्यांच्या मुकुटावर तसेच भुजाबंधावर सुद्धा नागाचे प्रतीक हे कुलचिन्ह म्हणून असायचे. नागवंशी असण्याची ती ओळख त्यांच्या अनुजांमध्ये विविध स्वरूपात प्रवाहित झाली. जसे की बोटांमध्ये अंगठी आणि भुजांवर बाजूबंद सुध्दा तसेच हात/मनगटावर नागप्रतिक गोंदणे आणि नागपंचमी च्या दिवशी भिंतीवर ५ नाग काढून त्यांची पूजा करणे. परंपरेच्या स्वरूपात त्याचे अस्तित्व आजही बघितले जाऊ शकते. अर्थात तसे करण्यामागचे नेमके कारण त्यांना ज्ञात नसते.
पण 'आपली परंपरा' म्हणून त्याचे अस्तित्व बहुजनांमध्ये भारताच्या विविधी कानाकोपऱ्यात अजूनही पाहायला मिळते.
नाग हे फार प्राचीन लोक होते. त्यांच्या बाबतीत हे लक्षात घेतले पाहिजे की, नाग हे कोणत्याही प्रकारे आदिनिवासी किंवा असंस्कृत लोक नव्हते. म्हणजेच ते बुध्दपूर्व होते. जे नंतर भगवान बुद्धाच्या अष्टविनयाचे पथगामी झालेत. बोधिवृक्षाला नागबंधु हे संबोधन देण्यामागचे कारण नागवंशियांनी बुध्दोत्तर काळात बोधिवृक्षाची पूजा करणे; त्या वृक्षाचा आदर बाळगणे हे होते. त्यामुळेच जेव्हा इ. स.७८ नंतर बुद्धमूर्ती तयार करून मूर्तिपूजा आरंभ झाली, तेव्हा सुद्धा स्वतः ला नागवंशिय मानणाऱ्या बौद्धांनी बुद्धमूर्तीच्या डोक्यावर नागछत्राचे प्रतीक असलेल्या मुर्त्या तयार केल्यात. नंतर बोधिवृक्षाखाली नागशिल्प ठेऊन बोधिवृक्ष आणि नागप्रतिक अशी एकत्रित पूजा सुरू केली होती.
वर्तमानातील कुणबी/शेतकरी, शेतमजूर नागपंचमी ला नागाची पूजा करतो; त्यामुळे तो हिंदू ठरत नाही. कारण नागलोकांचा संबंध (त्यांना हिंदू करण्यापूर्वी) बुध्दांशी होता .मात्र काळाचा महिमा असा की, प्रतिक्रांतीच्या झपाट्यात यज्ञवंशीयांनी त्याला कालांतराने राम-प्रेमी केले. त्यामुळेच त्यांचे पूर्वज बुध्दप्रेमी असण्याबद्दल तो अनभिज्ञ आहे. नाग प्रतीकाविषयीची नागवंशीयांची भावनिक जवळीक लक्षात घेऊनच ज्या बुद्धमूर्तीची पूजा नागवंशी बौद्ध करायचे त्या मूर्तीला यज्ञवंशियांनी परीवर्तीत केले. त्या मूर्तीच्या गळ्यात नाग अडकवून भासमान सारखेपणाव्दारे त्यांना सिव पूजक ( सिव म्हणजे मंगल मार्ग सांगणारे भगवा बुद्ध) ते शिवभक्त केले. भारतातील कित्येक अशी नागस्थाने आहेत;जी आज शिवपूजकांची श्रद्धास्थाने झाली आहेत. शिवाच्या यात्रेला दरवर्षी आवर्जून होणारी गर्दी, एकेकाळी बौद्ध (अष्ट-विनय-वादी) विचारधारेचे वाहन करणाऱ्या नागलोकांची होती. अगदी अशाच प्रकारे काही नागवंशी बौद्धांना मग विष्णु भक्त केले.
अन्य मुद्रेप्रमाणे बुद्धा़ंची महापरिनिर्वाण मुद्रा सुद्धा विशेष पूजनीय होती. बौद्धांनी त्या प्रतीकापुढे नतमस्तक होण्याचा भाव लक्षात घेत बुद्धापासून नागवंशीयांना तोडण्यासाठी तशीच पर्यायी मुद्रा तयार केली. त्या मूद्रेला यज्ञवंशीयांनी विष्णू असे लेखले आणि बुद्ध हा विष्णु चा अवतार होय ही बाब नागवंशीय / बौद्धांच्या डोक्यात टाकण्यासाठी खेळी खेळली. धार्मिक परिघाच्या बाहेर येऊन त्यापूर्वीच्या सांस्कृतिक पृष्ठ भूमीवरील आपले अस्तित्व धुंडाळण्याचा प्रयत्न करण्यासाठी 'नागपंचमी' या सणाचे महत्व नागवंशीयांनी जाणावे.
भारतीय नागरिकांना नागपंचमीच्या हार्दिक सदिच्छा!🙏
संकलन: सिरिमा शुभांगी
संदर्भ: नागपंचमी कोणाची?
0 टिप्पण्या