`कोरोना'साठी जितो ट्रस्टचे हाजुरी येथील रुग्णालय अधिग्रहित करण्याची मागणी
ठाणे
ठाणे शहरात कोरोनावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी पहिल्यांदा खाजगी रुग्णालय होरायझन प्राईमला मान्यता देण्यात आली होती. मात्र, सुमारे चार महिन्यांच्या काळात जादा बिले आकारल्याच्या रुग्णांकडून तक्रारी होत्या. त्याचबरोबर महापालिकेने केलेल्या बिलांच्या तपासणीत ५७ पैकी ५६ बिलांवर सहा लाख रुपयांची जादा आकारणी केली असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावरुन होरायझनची महिनाभरासाठी मान्यता काढून घेण्यात आली. त्याचबरोबर नवीन रुग्ण दाखल न करण्याचा आदेश देण्यात आला. या कारवाईमुळे शहरात बेडची संख्या अपुरी पडणार आहे. परिणामी महापालिकेच्या सहकार्याने जितो ट्रस्टने हाजुरी येथे उभारलेले रुग्णालय तत्काळ अधिग्रहित करावे, जेणेकरून कोविड रुग्णांची गैरसोय होणार नाही. अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.
होरायझन रुग्णालयात आयसीयूसह ८७ बेड आहेत. त्यामुळे कोरोनाच्या शहरातील रुग्णांना बेड मिळविण्यासाठी नातेवाईकांना धावपळ करावी लागणार आहेत. त्याचबरोबर अत्यवस्थ रुग्णांना उपचार करतानाही अडचणी येतील. या पार्श्वभूमीवर शहरातील आणखी एक प्रशस्त रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी अधिग्रहित करण्याची गरज आहे. ठाणे महापालिकेच्या सहकार्याने जितो ट्रस्टने हाजुरी येथे १२० खाटांचे रुग्णालय उभारले आहे. महापालिकेने रुग्णालयासाठी सुसज्ज इमारत प्रदान केली. या रुग्णालयात अद्ययावत आयसीयू कक्षही उभारण्यात आला असून, पुरेसे डॉक्टर व वैद्यकिय कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे जितो ट्रस्टचे रुग्णालय अधिग्रहित केल्यास शहरातील १२० रुग्णांची सहज सोय होऊ शकेल. त्यातून होरायझन बंद केल्यामुळे कमी झालेल्या ८७ बेडची संख्या भरून काढता येईल. त्यामुळे महापालिकेने तत्काळ जितो ट्रस्टचे रुग्णालय अधिग्रहित करावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे.
0 टिप्पण्या