Top Post Ad

बबन लव्हात्रे : लढाऊ आणि  मनमिळाऊ 'पँथर' नेता

बबन लव्हात्रे : लढाऊ आणि  मनमिळाऊ 'पँथर' नेता
■ दिवाकर शेजवळ ■



विदर्भातील 'पँथर' नेते बबन लव्हात्रे आज आपल्यातून निघून गेल्याची धक्कादायक आणि अतिशय दुःखदायक बातमी कानावर आदळली. 1972 ची राजा ढाले- नामदेव ढसाळ यांची आक्रमक दलित पँथर विदर्भात स्थापन करण्यात प्रकाश रामटेके,( Prakash Ramteke) बबन लव्हात्रे यांच्यासारख्या त्या काळातील निडर तरुणांचा पुढाकार होता. त्यात पुढे बबन कंठाने यांच्यासारख्या आणखी लढाऊ पँथर्सची भर पडली. अन पँथर विदर्भात फोफावली. त्यातील बबन कंठाने खूपच लवकर अकाली गेले. अन बबन लव्हात्रे आज वयाच्या 78 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले.


गटबाज रिपब्लिकन नेत्यांविरोधातील उद्रेकातून जन्मलेली दलित पँथरही गटबाजीला अपवाद ठरली नाही. तिच्याही चिरफळ्या उडाल्या. पण त्यानंतरही पँथर नाउमेद होऊन घरात बसला नव्हता.बरखास्त करण्यात आलेल्या पँथरला मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाने जीवदान मिळाले होते. बबन लव्हात्रे यांनी पँथर, मास मूव्हमेंट, दलित मुक्ती सेना आणि नंतर काँग्रेस असा प्रवास केला. ते काँग्रेसच्या आश्रयाला गेले, म्हणून त्यांना दोषी ठरवता येणार नाही. कारण रिपब्लिकन नेतृत्वाची 'झुल' पांघरलेल्या पँथर नेतृत्वाने आणि सेनापतींनीही युती - आघाडीच्या नावे काँग्रेसशीच दोस्ती करण्याची वाट चोखाळली.पण बबन लव्हात्रे हे झुंजार पँथर असले तरी त्यांचा मूळ पिंड हा तत्वचिंतकाचा, संशोधकाचा, विचारवंतांचा होता. ते काँग्रेसी राजकारणात रमणे शक्य नव्हते. मग नंतरच्या काळात त्यांनी  ग्रंथ लिखाणात स्वतःला गुंतवून घेतले होते. त्यातून बुद्धाच्या आणि संत कबिराच्या विचारांवर त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांचे अक्षर हे लोकांना राजा ढाले यांच्या अक्षराची आठवण करून द्यायचे.


1983 सालची गोष्ट. नामांतराचा लढा  हा पर्याय सुचवून, दलित नेत्यांना 'मॅनेज'  करून संपवता येणार नाही, हे लॉंगमार्चनंतरच सरकारला कळून चुकले होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तो लढा पाशवी पोलिसी बळाने चिरडून टाकण्याचेच धोरण अवलंबले होते. 1983 सालात दलित मुक्ती सेनेच्या आंदोलनावर नव्हे, तर औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणातील मेळाव्यावर सुद्धा अमानुष लाठीहल्ला करण्यात आला होता. प्रा जोगेंद्र कवाडे यांच्यासह अनेक भीमसैनिक आणि महिलाही त्यात रक्तबंबाळ झाल्या होत्या. त्यावेळी शेकडो भीमसैनिकांना अटक करून आधी औरंगाबादचे तुरुंग आणि नंतर नगरच्या विसापूर जेलमध्ये भीमसैनिकांना डांबण्यात आले होते. त्यावेळी नामांतर लढ्यात झोकून दिलेले पँथर बबन लव्हात्रे हे त्या तुरुंगात आमच्यासोबत होते. तीन आठवड्याचा तो तुरुंगवास होता.मी त्यावेळी 23 वर्षांचा होतो. पण लव्हात्रे साहेबांशी वैचारिक चर्चांमुळे चांगलीच गट्टी जमली होती. माझे धाकलेपण त्यांनी मैत्रीत आडवे येऊ दिले नव्हते. किंबहुना ते तरुणांची भूक अधिक असते, असे सांगत स्वतःच्या ताटातील थोडे जेवण माझ्यासाहित इतर तरुण भीमसैनिकांना काढून द्यायचे.  
लढाऊ आणि मनमिळाऊ पँथर नेते बबन लव्हात्रे यांना भावपूर्ण आदरांजली. मानाचा अखेरचा जयभीम.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com