13 व्या शतकात संत रोहिदास म्हणतात,
ऐसा चाहू मै राज। सबनको मिले अन्न।
छोटे बडे सबसम बैठे। रविदास रहे प्रसन्न ।
अर्थात मला अशी शासन व्यवस्था पाहीजे की, ज्यामधे कोणी उपाशी नसेल सर्वांना पोटभर अन्न मिळेल . लहान मोठे एकत्र रहातील भेदभाव नसेल. मात्र आज काय परिस्थिती आहे. आपण 21 व्या शतकात जगतोय एका बाजूला पंचतारांकीत हॉटेलमध्ये जेवणारी श्रीमंत लोक आणि एका बाजूला एक वेळ अन्नासाठी झटणारी जनता. एका बाजूला बंगल्यात, टॉवर मध्ये राहणारे लोक तर दुस्रया बाजूला झोपडपट्टी, सलमान सारख्या सेलिब्रेटीकडून बिनदिक्कतपणे चिरडली जाते ती फूटपाथवर झोपणारी जनता. ईंग्रजांविरूध्द क्रांतीविरांनी युध्द संग्राम यासाठी केला होता का? स्वातंत्र्याचा आपण अभिमान बाळगलाच पाहीजे. परंतु आज 70दशकाहून अधिक काळ स्वातंत्र्यदिन साजरी करताना देशातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक परिस्थिती पाहीली तर याचसाठी बलिदान दिले आमच्या क्रांतीविरांनी!! याचसाठी रक्त सांडले आमच्या क्रांतीविरांनी!! असा प्रश्न पडतो.
`माझ्या घालमोड्या दादा, तुम्ही उंटावरुन शेळ्या हाकणारी लोकं आणि माझा हा मेंढरासारखा समाज आहे तुम्ही आमच्याबरोबर न्याय कराल याची मला खात्री नाही त्यामुळे मी तुमच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात सामील होणार नाही असे क्रांतिबा ज्योतिराव फुले यांनी रानडेंना उद्देशून म्हटले होते. तर `माझ्यासारख्या रेड्याला तुम्ही सुचू देत नाही आणि माझा समाज तर शेळ्यामेंढ्यासारखा आहे त्यांचं तुम्ही काय कराल याची मी कल्पना सुध्दा करु शकत नाही. मी तुम्हा बामणांच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होणार नाही' राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी टिळकांना देखील अशा तऱहेने खडसावले होते. आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात, `पारतंत्र्यात ज्यांच्या आम्हाला बाता सहन होत नाहीत स्वातंत्र्यात त्यांच्या लाथा खाव्या लागतील.आणि म्हणूनच शेवटी अण्णाभाऊ साठे म्हणाले, `यह आझादी झूठी हैं देश की जनता भूखी हैं।' या सर्व महापुरुषांच्या वाक्यांचं आकलन केले. आणि सभोवतालची परिस्थिती पाहिली तर खरेच आपण स्वतंत्र आहोत का असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.
स्वातंत्र्याच्या सत्तर दशकाहून अधिक काळाचा प्रवास पाहिला तर आपण कोणत्या मुक्कामावर आहोत, याचा लेखाजोखा घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्य मिळाले असले तरी सुराज्य प्रस्थापित झाले का याही प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल. आज जागतिकीकरणाच्या झंझावातात स्वदेशी आणि राष्ट्रभावना समाप्त होत आहेत किंवा दुय्यम तरी ठरत आहेत. इंग्रज या देशातून गेले असले तरी नवीन प्रकारच्या `अंग्रेजियन'चा भाव वधारतो आहे. सत्तेच्या आकांक्षेमुळे सत्ताकांक्षी व सत्ताधारी वृत्तीमुळे अन्याय अत्याचार वाढतच चालला आहे. आज संपूर्ण देशात दलित व मागासवर्गीयांवर कुठे ना कुठे अन्याय अत्याचार सुरुच आहेत. कालपर्यंत छुप्यापद्धतीने होणारे अत्याचार आज खुले आम सुरु आहेत. गोरक्षकांनी निरपराध तरुणांवर केलेल्या अत्याचाराचे व्हीडीओ काढून सोशल माध्यमांद्वारे ते लोकांपर्यंत पोहोचवले देखील जात आहेत. हे सारे प्रशासन व्यवस्था बघून सुद्धा कोणावरही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने हे शासन कोणत्या प्रकारच्या व्यवस्थेचे समर्थन करते हे आता लपून राहिलेले नाही.
प्रशासन व्यवस्थेच्या ढिलाईमुळे दिवसेंदिवस अत्याचाराचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. गत वर्षात कोरोनाच्या महामारीने भारतात हाहाकार माजवला. चार महिने लोक घराला कुलूप लावून बसले. बाहेर जाणे नाही की येणे नाही. ज्यांची परिस्थिती विपूल होती. त्यांच्यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट आम्हाला फिरायला मिळत नाही अशी ओरड ते करत होते. तर सर्व सामान्य माणूस आम्हाला काम द्या. आम्हाला खायला द्या अशी आर्द हाक मारत होता. सरकारने नेहमीप्रमाणे आश्वासनांचा पाऊस पाडला. प्रत्येकाला रेशन दुकानावर मोफत रेशन मिळेल. असे जाहीर सांगितले. मात्र रेशनदुकानांवर रेशनच पोहोचवले नाही. लोक रेशनदुकानदारांवर रोष काढू लागले. (9 ऑगस्ट) च्या पत्रपरिषदेत वंचित बहुजन आघाडीचे नेते मा.बाळासाहेब आंबेडकर यांनी याबाबतचा लेखा जोखा मांडला. आणि वास्तव परिस्थिती लोकांसमोर आली.
मागील चार महिन्यापासून सुरु असलेला लॉकडाऊन पाहिला की आमच्या मनात नेहमीच अगदी सुरुवातीपासून हिटलरच्या गॅस चेंबरची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. इथे सत्ताधाऱयांना कोरोनाने आयतीच संधी उपलब्ध करून दिली. डॉ.कोठारी सारखे अनेक डॉक्टर ही महामारी नाही म्हणून ओरडून सांगत आहेत. अगदी च़ँलेंज देत आहेत. मात्र प्रशासन त्यांच्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहे. याचा अर्थ साफ आहे की, कोरोनाच्या आडून सरकारला इथला श्रमिकवर्ग, गोरगरीब जनता संपवायची आहे. आधीच नोटबंदीसारखे निर्णय घेऊन ही जनता कशीबशी कुबड्यांच्या आधारे जगत आहे. त्या कुबड्याही या लॉकडाऊनच्या काळात काढून घेण्याचा डाव सरकारने केला. करोडो लोक बेरोजगारीच्या खाईत लोटले गेलेत सरकारमात्र आश्वासनापलिकडे जात नाही. बोलणी आणि करणीमध्ये जमीन आस्मानाचे अंतर ठेवून केवळ भूलभूलय्या निर्माण करण्याचे काम केले जात आहे. याच साठी लाखो लोकांनी बलिदान केले होते काय? केवळ मुठभर लोकांच्या स्वार्थासाठीच हा लढा लढल्या गेला होता की काय अशी शंका आल्याशिवाय रहात नाही. मागील काही वर्षात इथल्या कित्येक बड्या उद्योगपतींची कर्जे अगदी सहजतेने माफ केली गेली. बँकांनी ती बुडीत म्हणून दाखवली... तर काहीच्या उद्योगधंद्याचा करोडो रुपयांचा टॅक्स सरकारने माफ केला. दुसरीकडे सरकार सर्व सामान्यांना हाल हाल करून मारत असल्याची परिस्थिती दिसत आहे. ज्यांनी स्वतंत्र्य सुरुवातीपासूनच आपल्या हातात ठेवलं तीच लोकं आजही सत्ताधारी बनून इथल्या वंचित, बहुजनांना पुन्हा गुलामिगीरीत ढकलत असल्याचे पावलोपावली दिसत आहे. याकरिताच अण्णाभाऊ साठे सारख्या व्यक्तींनी स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी मोर्चा काढून या तकलादू स्वातंत्र्याचा निषेध केला होता. मात्र इथल्या प्रस्थापितांनी त्यांना डावललेच पण सर्वसामान्य भारतीयांनाही त्यांच्या मोर्च्यामागचे गणित कळले नाही. परिणामी आज स्वातंत्र्याची सत्तरी उलटूनही दारिद्र रेषेखाली प्रचंड गर्दी आणि वरती मात्र काही मूठभरच... म्हणूनच आज भारतातील सर्व सामान्य माणसाला एकच प्रश्न पडला आहे..... सांगा धनाचा साठा नी आमचा वाटा कुठं हाय हो....!
-- सुबोध शाक्यरत्न
0 टिप्पण्या