इमारतीच्या बांधकामात कोणताही बदल करण्यासाठी दोन तृतीयांश सदनिकाधारकांची परवानगी आवश्यक
पनवेल
कोणत्याही इमारतीमध्ये सदनिकाधारकांनी ताबा घेतल्यानंतर त्या इमारतीच्या बांधकामात कोणताही बदल करणे अथवा अतिरिक्त मजला चढवणे यासाठी सदर इमारतीत राहणाऱ्या सदनिकांपैकी दोन तृतीयांश सदनिकाधारकांची परवानगी आवश्यक असल्याचा निर्वाळा महारेराने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिला आहे. न्यू पनवेलमधील नीलकंठ कन्स्ट्रक्शनविरोधात त्याच प्रकल्पातील ४ सदनिकाधारकांनी तक्रार दाखल केली होती. यावेळी नीलकंठ बिल्डर्सविरोधात महारेराने निकाल दिला आहे.
अनेक ठिकाणी बिल्डर परस्पर इमारतीवर अतिरिक्त मजला चढवण्यासाठी बांधकाम करतो, मात्र, त्यासाठी इमारतीतील सदस्यांना विचारात घेत नाही. परिणामी या सदस्यांवर हातावर हात धरून राहण्याशिवाय पर्याय राहत नाही. नीलकंठ बिल्डर्सच्या न्यू पनवेलमधील नीलकंठ विहार फेज १ मध्ये राहणारे वैभव बल्लाळ सुजय जोशी, निखिल बरे आणि दीपेश सिंह, यांनी यासंदर्भात महारेराकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर निकाल देताना महारेराने नमूद केल्यानुसार रिअल इस्टेट (रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट) अॅक्ट (RERA) २०१६च्या कलम १४ नुसार इमारतीच्या प्लॅनमध्ये कोणताही बदल करावयाचा झाल्यास त्यासाठी इमारतीत घर असणाऱ्या २/३ सभासदांची परवानगी आवश्यक आहे. नीलकंठ बिल्डर्सनी ही बाब पाळली नसल्यामुळे त्यांच्याविरोधात हा निकाल गेला आहे.
0 टिप्पण्या