सरकारी लॉकडाऊन विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात डफली बजाव आंदोलन
मुंबई
कोरोनामुळे सध्या लॉकडाउन लावण्यात आला आहे. या लॉकडाउनचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज 12 ऑगस्ट रोजी राज्यभर 'डफली बजाव आंदोलन' करण्यात आले. राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे. तर दुसरीकडे, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो आणि शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर, अमरावतीसह अनेक शहरांमध्ये वंचितकडून डफली बजाव आंदोलन करण्यात आले.
'सार्वजनिक वाहतूक, लहान दुकाने वगैरे बंद ठेवण्याचं काहीच कारण नाही. लोकशाहीमध्ये जनता मालक असते,सरकारने मालक होण्याचा प्रयत्न करू नये. सक्तीचे लॉकडाउन त्वरित उठवून लोकांना त्यांचा निर्णय घेऊ द्यावा'. या मागणीसह वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी नागपुरातून या आंदोलनाला सुरूवात केली. नागपूरातील मोरभवन बस स्थानकासमोर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. शहरी आणि ग्रामीण भागातील एसटी सेवा १५ ऑगस्टपर्यंत पूर्णतः सुरू करा, अशी मागणी या आंदोलना दरम्यान करण्यात आली. शिवाय सरकार विरोधात जोरदार निदर्शने देखील करण्यात आले.
सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करा, जिल्ह्याबाहेरील वाहतुकीला परवानगी द्या, ठिक-ठिकाणी असलेले लॉकडाऊन हटवा या मागणीसह आज वंचित बहूजन आघाडीने राज्यव्यापी 'डफली बजाव आंदोलन' केले. या आंदोलनाला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला असून अनेक नागरिकांनी यात सहभाग घेतला.गेल्या चार महिन्यांपासून ऑफिस, दुकाने, हॉटेल, मार्केट्स इत्यादी गोष्टी बंद असल्यामुळे लोकांचा आपापसांतील संपर्क कमी झाला आहे. महाराष्ट्रातील तज्ञ मंडळींनी कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास केल्यानंतर, कोरोनाविरोधात लढण्याची क्षमता 80 टक्के नागरिकांमध्ये असल्याचे सांगितले आहे. यामुळे राज्यातील लॉकडाऊन हटवण्यासह वाहतूक सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी शहरातील 11 बस डेपो आणि एसटी डेपोंबाहेर आंदोलन करण्यात आले.
जिथे ३००-४०० रूपये वाहतूक भाड असायला पाहिजे, तिथे खासगी वाहनाकडून हजारो रूपये घेतले जात आहे. ही लुट सरकारकडूनच केल्या जात असल्याचा आरोपही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला. बस सेवा सुरू राहिल्या असत्या तर लोकांची लुट झाली नसती. त्यामुळे शासनाने लवकर वाहतूक सेवेचा एसओपी तयार करा, जर शासन १५ ऑगस्टपर्यंत सार्वजनिक वाहतूक सेवा व आंतरजिल्हा सेवा सुरू केले नाही, तर सर्व बंधने तोडण्याचे आंदोलन आम्ही सुरू करू, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला सरकारला लोकांचा विश्वास जिंकायचा असेल तर सम विषमचा झोल तात्काळ थांबवा, तसेच आंतरजिल्हा वाहतूक सेवा सुरू करून लोकांना दिलासा द्या, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.
0 टिप्पण्या