Top Post Ad

महत्वाच्या विषयांवरील आकडेवारी लपवून सरकारचे अपयश झाकण्याचे तंत्र

 काही राज्य सरकार शेतकरी आत्महत्यांची माहिती देत नसल्याने त्याचा अहवाल देण्यास एनसीआरबीने असमर्थता दर्शवल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून शेतकरी आत्महत्या लपवण्याची ही दिक्षा इतर राज्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडूनच घेतली आहे. महत्वाच्या विषयांवरील आकडेवारी लपवून सरकारचे अपयश झाकण्याचे मोदी सरकारचे लोण शेतकरी आत्महत्या लपवण्यापर्यंत पोहचले असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. 


देशात अनेक यंत्रणा उभारल्या त्या योग्य ती माहिती केंद्र सरकारला मिळावी आणि त्यातून धोरणात्मक निर्णय घेण्यास त्याची मदत व्हावी यासाठी. परंतु मोदी सरकार आल्यापासून या यंत्रणाच कचकामी ठरत आहेत, त्याचे मुळ खोट्या गुजरात मॉडेलमध्ये दडलेले आहे. गुजरात सरकारने शेतकरी आत्महत्या लपवण्याचे काम मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार असताना केले. आता जर काही राज्य सरकारांकडून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची माहिती दिली जात नसेल तर दोष त्यांचा नाही, तो दोष मोदींच्या आचाराची, विचाराची दिक्षा इतर राज्यांनी घेतल्यामुळे असल्याचा आरोप त्यांनी केला.


गुजरातमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतच नाहीत अशी धादांत खोटी माहिती तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व त्यांचे सरकार जाहीरपणे सांगत होते. ३० मार्च २०१४ रोजी अमरावती येथे झालेल्या जाहीर सभेत मोदींनी शेतकरी आत्महत्या व गरीबीचा प्रश्न उपस्थित करून मागील तीन वर्षात गुजरातमध्ये एकाही शेतकऱ्यांने आत्महत्या केली नाही असे म्हटले होते, त्याच दिवशी भाजपचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष खा. पियुष गोयल यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनाही गुजरातमध्ये शेतकरी आत्महत्या झाल्या नसल्याचा दावा केला होता. त्यांचा हा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ३१ मार्च २०१४ रोजी पुराव्यानिशी खोडून काढत गुजरातमध्ये शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी दिली होती. गुजरात विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नाच्या उत्तरातच शेतकरी आत्महत्यांची माहिती होती, पण मोदी सरकारने ती लपवून ठेवली होती. पुढे तर २०१७ मध्ये केंद्रीय गृह विभागाने  २०१३ ते २०१५ मध्ये गुजरातमध्ये १४८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे कबूल केल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही गोष्टीची सत्य आकडेवारी जाहीर करायची नाही हेच गुजरात मॉडेल होते आणि आजही आहे. तेच मॉडेल भाजपाचे मोदीसरकार केंद्रात राबवित असल्याचा आरोप सावंत यांनी केला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com