रिपब्लिक टिव्हीच्या पत्रकारांचा मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसमध्ये शिरण्याचा प्रयत्न
रायगड :
रायगड येथील खालापूर तालुक्यातील भिलवले येथे असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फार्महाऊसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना दहशतवादी विरोधी पथकाकडून (एटीएस) अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले तिघे जण है रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार असल्याचे समजते. या तिघांनाही एटीएसने ताब्यात घेत त्यांना कोर्टात हजार करण्यात आले असून ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानी धमकीचा फोन आला होता. तसेच टुरीस्ट कारने आलेल्या तिघा जणांनी बंगल्याची रेकी केली असल्याने याबाबत या तिघा जणांची दहशतवाद विरोधी पथकाकडून कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान, खालापूर आणि फार्महाऊसवरील पोलिसांची कुमक आणि दंगल नियंत्रण पथकाचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक स्वत: खालापूरला एटीएससोबत तपास कार्यात आहेत.
मंगळवारीमंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास सायंकाळी या तिघांनी आधी इम्तियाझ खत्रीच्या बंगल्याची चौकशी केली. त्यानंतर तिथल्या सुरक्षारक्षकाला मुख्यमंत्र्यांचा बंगला कुठे आहे अशी विचारपूस करण्यात आली. या सुरक्षारक्षकाने आपल्याला माहित नसल्याचे उत्तर दिले. त्यानंतर है तिघेही तिथून निघून गेले. मात्र सुरक्षारक्षकाचा पाठलाग करीत ते बंगल्यापर्यंत पोहोचले. बंगला माहित असूनही खोटे का सांगितले, असे म्हणत या तिघांनी सुरक्षारक्षकाला शिवीगाळ करत मारहाण केली. आणि तिथून पळ काढला. संबंधित सुरक्षारक्षकाने तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. तिघांच्या गाडीचा नंबर पोलिसांसह मुख्यमंत्र्यांना कळवण्यात आला.या माहितीनंतर नाकाबंदी लावून त्यांना पकडण्यात आले. विनापरवानगी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात शिरण्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतल्यानंतर हे तिघेही रिपब्लिक टिव्हीचे पत्रकार असल्याचे समोर आले. या घटनेनंतर फार्महाऊसवर पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला आहे. तर दंगल नियंत्रण पथकाचा देखील बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
0 टिप्पण्या