नवी मुंबई लेणी बचाव आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
नवी मुंबई
पनवेल येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधीत क्षेत्रातील वाघिवली वाडा येथील केरुमाता मंदीराच्या ठिकाणी असलेल्या बौद्धकालीन लेण्या निष्कासित केल्याच्या निषेधार्थ सिडको प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांविरोधात पनवेल शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. आंदोलकांनी विनापरवानगी ठिय्या आंदोलन करुन मनाई आदेशाचा भंग केल्याने त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सिडकोच्या पनवेल येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित क्षेत्रातील वाघिवली वाडा येथील केरुमाता मंदिर परिसरात बौद्धकालीन लेण्या संरक्षीत करण्यात याव्यात यासाठी शेतकरी प्रबोधीनीचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी मागील काही वर्षापासून लढा सुरु केला आहे. मात्र त्यानंतर देखील सिडकोने येथील लेण्या निष्कासित केल्याने मंगळवारी पनवेलचे उपमहापौर तथा आरपीआयचे नेते जगदीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पनवेल शहर पोलीस ठाण्याजवळ सिडको विरोधात ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात प्रमुख कार्यकर्त्यांसह सुमारे 200 कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केरुमाता मंदिराच्या ठिकाणी असलेल्या बौद्धकालीन लेण्या संरक्षित करण्यात याव्यात, अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.
त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त गिइडे यांची भेट घेऊन सिडकोने बौद्धकालीन लेण्या पाडल्याने सिडको विरोधात गुन्हे दाखल करावेत अशी विनंती केली. दरम्यान, सिडको विरोधात ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी विनापरवानगी आंदोलन करुन पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याने पनवेल शहर पोलिसांनी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्यासह महेश खरे, राजाराम पाटील, भास्कर पवार, अमोल इंगळे, मोहन गायकवाड यांच्या विरोधात भादवि कलम 188 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
0 टिप्पण्या