आमचे बिल कमी करता मग सर्वसामान्यांचे का नाही - भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा सवाल..
ठाणे
कल्याण पूर्वेकडील आमदार गणपत गायकवाड यांनी देखील महावितरणचा भोंगळ कारभार उघड केला आहे. आमदार गायकवाड यांच्या केबल कार्यालयाला महावितरणने 5 लाख रुपयांचे बिल धाडले होते. इतकी मोठी रक्कम पाहून केबल कार्यालयातील कर्मचाऱ्याने तातडीने महावितरण कार्यालयात जाऊन चौकशी केली असता हे बिल जवळपास 3 लाख रुपयांनी कमी करून देण्यात आले आहे. आमदाराच्या कार्यालयाचे बिल होते म्हणून तत्काळ कारवाई झाली पण सर्वसामान्यांचे काय असा सवाल स्वतः आमदार गणपत गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे गरीब जनता मेटाकुटीला आली आहे. विजेची बिले हजारो आणि लाखोंच्या किमतीत धाडत नागरिकांना महावितरणने जगणे असह्य केले आहे. याची चौकशी करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना कार्यालयातील कर्मचारी कॅलक्युलेटरवर हिशोब करून दाखवत धाडलेले बिल बरोबर असल्याचे दाखवत त्यांची बोळवण करत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. सर्वसामान्य नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिले महावितरणकडून धाडली जात असून विचारणा करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची बोळवण होते. महावितरणच्या भोंगळ कारभारावर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. त्यांनी आपल्यासारखेच हजारो नागरिकांना चुकीची बिले महावितरण तर्फे धाडली जात असल्याचा आरोप केला आहे .
0 टिप्पण्या