मुंबई विभागातील भिवंडी रोड स्थानकातून पहिली पार्सल ट्रेन रवाना
मुंबई
मध्य रेल्वेतील मुंबई विभागाच्या बिझिनेस डेव्हलपमेंट युनिटने माल वाहतुकीत आक्रमक वाढ करण्याच्या दृष्टीने अनेक प्रकारे पुढाकार घेतले आहेत. या प्रयत्नांच्या फलस्वरूप भिवंडी रोड स्टेशन गुड्स आणि पार्सल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आले. रेफ्रिजरेटर, फर्निचर, औषधे, कॉस्मेटिक इत्यादी वस्तूंनी संपूर्णपणे भरलेल्या ५ पार्सल व्हॅनसहित प्रथम पार्सल ट्रेन ९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील भिवंडी रोड स्टेशन ते बिहारमधील दानापूरपर्यंत धावली. अंदाजे ११५ टन पार्सलने भरलेल्या ह्या पार्सल ट्रेन पासून रू. ४,१३,९२८/ - चे उत्पन्न मिळाले. दानापूर (पाटणा) येथील पुढील प्रवासासाठी ह्या पार्सल व्हॅन देवळाली स्टेशन येथे किसान रेलला जोडण्यात येणार आहेत.
भिवंडी रोड स्टेशन गुड्स व पार्सल वाहतुकीसाठी विकसित करण्यासाठी रेल्वेच्या बिझिनेस डेव्हलपमेंट युनिटने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भिवंडी हे अनेक गोदामे आणि उद्योग असलेले प्रसिद्ध शहर आहे. भिवंडी रोड स्टेशन गुड्स व पार्सल वाहतुकीसाठी सुरू केल्याने संलग्न सेवा उद्योगांमध्येही रोजगार निर्माण होईल. हे स्थानक उत्तर-दक्षिण जोडणाऱ्या रेल्वे मार्गावर आहे आणि जेएनपीटीशी देखील जोडले गेले आहे, त्यामुळे मुंबई आणि ठाणे शहरांच्या निकटतेमुळे त्याचा फायदा होतो. भिवंडी हे अनेक पॉवर लूम्समुळे वस्त्र उद्योगासाठीही प्रसिद्ध आहे.
मध्य रेल्वे, औषधे, हार्ड पार्सल, रेल्वे मेल सेवा, ई-कॉमर्स वस्तू, नाशवंत माल इत्यादी पाठविण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) -शालीमार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) -चेन्नई सेंट्रल पार्सल विशेष ट्रेन देखील दिनांक ३१.१२.२०२० पर्यंत चालवित आहे. लॉकडाउन व अनलॉक झाल्यापासून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ३७० पार्सल गाड्या चालवित आतापर्यंत १३,०६५ टन पार्सल व इतर वस्तूंची वाहतूक केली आहे. मध्य रेल्वेत क्षेत्रिय आणि विभागीय स्तरावर बहु- अनुशासित व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) ची स्थापना केली आहे. वरीष्ठ अधिका-यांचा समावेश असलेला हा युनिट रेल्वेत अधिक वाहतूक संधी निर्माण करण्यासाठी व्यापार आणि उद्योगाशी वारंवार संवाद साधत आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे मध्य रेल्वे, जनसंपर्क विभाग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून जारी करण्यात आली आहे.
प्रप क्रमांक 2020/09/17
0 टिप्पण्या