मोजून पाच-दहा लोकांचीच श्रीमंती वाढली. बंदिवान देवांचीच ही करणी काय हो निर्मलाबाई
मुंबई
'करोनाची आपत्ती ही ‘देवाची करणी’ आहे यामुळे यावेळीही अर्थव्यवस्था ढासळणार आहे असे विधान स्वतंत्र भारताच्या भाजप प्रणित सरकारच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनातून देवाबद्दल असलेली श्रद्धा खुंटल्या गेली असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. यामागे देव या संकल्पनेला संपवण्याचा कट तर नाही ना असा प्रश्नही सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. यामुळे सीतारामन यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. आम्ही थाळी वाजवल्या. दिवे लावले तरीही हिन्दुत्ववादी सरकार देवाला दोष देत आहे याबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत असतानाच आता आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातील ‘रोखठोक’ या आपल्या सदरातून सीतारामन यांच्यावर निशाणा साधला. सरकारचे अपयश झाकण्यासाठी देवांना आरोपी करायचं हे कसलं हिंदुत्व? असे म्हणत त्यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर शरसंधान साधले. देव गुन्हेगार ठरवले जात असतील तर देवांवर कोणत्या न्यायालयात खटला चालवायचा?' असा रोखठोक सवाल राऊतांनी विचारला आहे. भारताच्या नव्हे तर हिंदुस्थानच्या अर्थमंत्र्यांनी केलेले विधान हिन्दुत्वाच्या आर्थिक महासत्तेचा ढोल वाजवणाऱ्य़ा देशाला शोभणारे नाही. देशातील बहुसंख्य जनतेची गरिबी वाढली आणि मोजून पाच-दहा लोकांचीच श्रीमंती वाढली. बंदिवान देवांचीच ही करणी काय हो निर्मलाबाई?
अग्रलेखात नेमके काय?
देशाच्या बिघडलेल्या अर्थव्यवस्थेवर बोलणे हे आता पाप ठरत आहे. आपले पंतप्रधान मोदी सर्वच विषयांवर त्यांचे मन मोकळे करीत असतात, पण कोसळलेली अर्थव्यवस्था व त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांना ते स्पर्श करायला तयार नाहीत. नोटाबंदी ते लॉक डाऊन या मार्गावर आपली अर्थव्यवस्था साफ मरून पडली आहे. पण या पानिपताचे खापर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरळ देवावर फोडले.
कोरोना देवानेच आणला. त्यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. कोरोना ही देवाचीच करणी. त्याला सरकार काय करणार? सरकार टोकाचे देवभोळे आणि धर्माधिष्ठत असल्याचा हा परिणाम. हिंदुत्वाशी मी या देव-देवस्कीचा संबंध जोडणार नाही. फुले-आंबेडकर-प्रबोधनकार ठाकरे यांचा महाराष्ट्र देव आणि धर्म मानतो, पण अंधश्रद्धेला मूठमाती देतो. स्वतःच्या अपयशाचे खापर देवावर फोडणे हाच हिंदुत्वाचा अपमान आहे.
कोरोना देवाची करणी असे केंद्र सरकारनेच जाहीर केल्यामुळे सरकारची जबाबदारी संपली हे पाहिले व देवदूत डॉक्टरांचाही निकाल लावला. आता देवच कोरोनाग्रस्तांना बरे करेल. मग ती लस तरी का शोधायची? हा प्रश्नसुद्धा आहेच. हिंदुस्थानच्या अर्थमंत्र्यांनी केलेले विधान आर्थिक महासत्तेचा ढोल वाजवणाऱ्य़ा देशाला शोभणारे नाही.
जादूटोणावाले देशाच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री आहेत की जादूटोणावाले? चीन लडाख परिसरात घुसला आहे व मागे हटायला तयार नाही हीसुद्धा आता देवाचीच करणी म्हणायला हवी. जसा राजा तशी प्रजा हे नेहमीच म्हटले जाते. प्रजेला तिच्या लायकीप्रमाणे राजा मिळतो हेसुद्धा सत्यच आहे.
कोरोना म्हणजे ‘ऍक्ट ऑफ गॉड’ म्हणजे देवाची करणी असे सरकारी पातळीवर जाहीर होताच प्रजा तरी कशी मागे राहील? बिहारमधल्या एका गावातील महिलांनी वेशीबाहेर कोरोना देवीचे मंदिर उभे केले. त्याच वेळी महाराष्ट्रातील ‘बार्शी’ येथे कोरोना रोखण्यासाठी कोरोना देवीचीच स्थापना करण्यात आली. कोरोना देवीला प्रसन्न करण्यासाठी कोंबडी-बोकडाचा नैवेद्य दिला जातोय.
देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी लोकांनी बार्शीच्या बाजारपेठेत गर्दी केली तेव्हा प्रशासन जागे झाले. कोरोना देवीची स्थापना करणाऱ्य़ा ताराबाई पवारांवर बार्शीच्या तहसीलदारांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा दाखल केला. हा बडगा जनतेवर उगारला. पण कोरोना म्हणजे देवाचा प्रकोप असे जाहीरपणे सांगणाऱ्य़ा निर्मला सीतारामन यांच्यावरही त्याच कायद्याने गुन्हा दाखल का झाला नाही?
देव काय म्हणतोय? आधी कोरोना व नंतर आर्थिक घसरण हे संकट आहेच. पण कोरोना येण्याआधीच देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. त्याचे खापर कोणावर फोडणार? हिंदुस्थानात या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ‘जीडीपी’चा आकडा 23.9 टक्के एवढा कोसळला. ही पडझड मानवी चुकांची व बेफिकीर वृत्तीची करणी आहे. अर्थव्यवस्थेचे मातेरे केले. त्याचे खापर देवावर फोडणे हा मानसिक गोंधळ आहे.
हजारो वर्षांपूर्वी ऑरिस्टॉटलने म्हटले होते की, ‘जोडे वापरणाऱ्य़ालाच ते कुठे बोचतात ते कळते.’ जोडे वापरणारी जनता, दुःख भोगणारा सर्वसामान्य माणूस. मग ही दुःखे राज्यकर्त्या नोकरशाहीला, मग ती पक्षाची असो वा सरकारची, कळणारच कशी? आजही काही स्थिती वेगळी नाही.
पण हा सर्व दैवी प्रकोप आहे. त्यामुळे सरकारवर ठपका ठेवून काय उपयोग? पण देवांना दोष द्यायचा तर देवसुद्धा बंदिवान आहेत. मुख्य म्हणजे माणसांच्या संरक्षणात ते आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर देवांनी करणी केली असे का बोलता? विजय मल्ल्या, नीरव मोदी, हर्षद मेहता, बँकांची कर्जे बुडवणाऱ्य़ा भांडवलदारांनी देश बुडवला. जे गेल्या 70 वर्षांत झाले ते मागच्या सहा वर्षांतही बदलले नाही. देशातील बहुसंख्य जनतेची गरिबी वाढली आणि मोजून पाच-दहा लोकांचीच श्रीमंती वाढली. बंदिवान देवांचीच ही करणी काय हो निर्मलाबाई?
0 टिप्पण्या