दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा
गेल्या १५ दिवसात मोठ्या प्रमाणावर दिव्यातील अनधिकृत बांधकामे निष्कासित
ठाणे
ठाणे महापालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती अंतर्गत मुख्य रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम, बेवारस वाहनांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्या आदेशानुसार हीकारवाई करण्यात आली असून या कारवाईत दुकानांच्या शेडस्, टपऱ्या जेसीबीच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आली तसेच बेवारस चार चाकी, तीन चाकी व दुचाकी जप्त करण्यात आली. गेल्या १५ दिवसांपासून दिवा प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनानुसार दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी ही कारवाई केली.
शिळ भोलेनाथ नगर येथील तळ अधिक चार मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील आर.सी.सी स्लॅब व आर.सी.सी कॉलम तोडण्यात येवून गॅस कटरच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले. तसेच विशाल भगत यांचे घराशेजारील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील अनधिकृत बांधकाम,फडकेपाडा तलावजवळील, शिबलीनगर, देवरीपाडा, कौसा येथील अनधिकृत हुक्का पार्लरचे बांधकाम निष्कासित करण्यात आले. सदरची कारवाई ३ ते ८ सप्टेंबर या कालावधीत करण्यात आली. तसेच शिळ येथील अजीम मुकरी, हबीब सय्यद नौरोजी यांनी इमारतीवर अनधिकृतपणे बांधलेल्या वाढीव मजल्याचे बांधकाम निष्कसित करण्यात आले. गेल्या तीन दिवसांत शिळ फाटा ते दोस्ती प्लॅनेट, दिवा स्टेशन ते वैभव ढाबा मुख्य रस्ता, खार्डी दिवा रोड ते मुख्य रस्ता या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत दुकानांच्या शेड, टपऱ्या जेसीबीच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आल्या. महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्या आदेशानुसार करण्यात आलेली ही कारवाई यापुढे देखील सुरू राहणार असल्याचे दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी नमूद केले.
0 टिप्पण्या