संरक्षक कठडे कोसळल्याने, तानसा नदीवरील ०४- क्रॉसकनेक्शन पुल झाला धोकादायक!
महाडच्या सावित्री नदी दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती ?
वाहन चालकांसह प्रवाशांच्या जीवाला धोका
शहापूर
बांधकाम जिर्ण झालेला पुल , कोसळलेले पुलाचे संरक्षक कठडे, बाजूला खोल नदी, अरुंद रस्ता. येथून वाहने चालवतांना क्षणभर पुल पार करताना प्रवाशांना व वाहन चालकांना धडकीच भरते. सध्या शहापूर- वाडा रस्त्यावरील झिरोफोर क्रॉसकनेक्शन जवळील तानसा नदीच्या पुलावरुन वाहन चालकांचा हा थरारक व जीवघेणा प्रवास सुरु आहे.
या पुलाचे संरक्षक कठडे कोसळून पडल्याने तसेच अरुंद रस्ता. पुलाचे बांधकाम जिर्ण झाल्याने या मार्गावरील गाव-पाड्यांतील हजारो प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पुलाचे लोखंडी कठडे तुटल्याने येथून चालनारी बस, जीप, रिक्षा, कार, दुचाकी आदि वाहने आपला जीव धोक्यात घालून या पुलावरुन वाहतूक करीत आहेत. एखादे वाहन जर या पुलावरुन खाली पडल्यास ते शंभर फुट खोल नदीत पडण्याची भीती आहे. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या या पुलावर रात्रंदिवस हा जीवघेणा प्रवास सुरु असल्याचे भयानक चित्र दिसत आहे.
शहापुर तालुक्यातील आटगाव गावातून जाणाऱ्या शहापूर - वाडा रस्त्याच्या मार्गावर बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या अघई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा पाईप लाईनच्या झिरोफोर क्रॉसकनेक्शन जवळ असलेला तानसा नदीवर हा पुल आहे. या पुलाला ५०-६० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्याने बांधकाम पूर्णतः जीर्ण होत चालले आहे. बांधकाम विभागाने देखभाल व दुरुस्ती योग्य वेळी न केल्याने या पुलाचे संरक्षक लोखंडी पाईपचे कठडे जीर्ण होऊन कोसळून उध्वस्त झाले आहेत. पूर्ण कठडे तुटल्याने तसेच पूल अरुंद असल्याने हा पुल वाहतुकीकरिता धोकादायक झाला आहे. या पुलावरुण रोज शेकडो वाहने धावतात. या मार्गावर शहापुर- आटगाव,साखरोली, नांदगाव ,तलावातील पाडे, तानसा, आकराचा पाडा, चिंचेचा पाडा, भावसे, मोहिली, अघई, नेवरे, खोस्ते, नेहालपाडा, कांबारे, अबिटघर, सावरखांड, जांभुळपाडा , शिरिषफाटा, गांधरे आणि वाडा आदि गावे व अनेक पाडे जोडले आहेत. हा मार्ग पुढे जव्हार व विक्रमगड या शहरांकडे जातो. महाडच्या सावित्री नदी दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती येथील पन्नासहून अधिक गावांच्या संतप्त नागरिकांकडून व्यक्त केली जात असून बांधकाममंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे इकडे लक्ष दया असेही बोलले जात आहे.
0 टिप्पण्या